कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे

आज शुक्रवार सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है|

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु मंडे

पार्श्वभूमी:

ब्लु कुरासो (blue curacao, pronounced as “blue cure-a-sow”) हे निळ्या रंगाचे एक मस्त ऑरेंज बेस्ड लिक्युअर आहे, माझ्या आवडीचे. अतिशय भन्नाट चव असते ह्या लिक्युअरची. ब्लु कुरासो च्या भन्नाट चवीमुळे अतिशय मस्त कॉकटेल्स बनतात. ह्याचा नॉन अल्कोहोलिक सिरपही मिळतो जो मॉकटेल्स बनवण्यासाठी वापरला जातो.

प्रकार: वोडका आणि ब्लु कुरासो बेस्ड कॉकटेल

साहित्य:

वोडका (ऑरेंज फ्लेवर्ड असल्यास उत्तम) 1.5 औस (45 मिली)
क्वांत्रो (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) 0.5 औस (15 मिली)
ब्लु कुरासो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा काप सजावटीसाठी
बर्फ
कॉकटेल शेकर

ग्लास: – कॉकटेल

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे बर्फ आणि पाणी टाकून ग्लास फ्रॉस्टी होण्यासाठी फ्रीझमधे ठेवा. शेकर मध्ये बर्फ टाकून त्यात अनुक्रमे वोडका, क्वांत्रो (pronounced as “qwan-tro”) आणि ब्लु कुरासो ओतून घ्या. शेकर व्यवस्थित शेक करून घ्या. शेकर खालच्या फोटोप्रमाणे दिसला पाहिजे.

लिंबाचा काप ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा.

आकर्षक ब्लु मंडे तयार आहे. 🙂

नोट: नविन घेतलेल्या कॉकटेल नाइफने काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला लिंबाच्या कापावर पण तो जरा ग़ंडला, त्यामुळे तो काप जरा ‘टाईट’ झाल्यासारखा दिसतो आहे. 😉

कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

बर्‍याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अ‍ॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्‍यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

पार्श्वभूमी:

हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. ‘अ‍ॅप्पल स्ट्रुडेल’ ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे. पण मलिबूने त्यांचे एक व्हेरिएशन मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल बनवले, अतिशय मर्यादित साहित्याने. मग मीही त्याला एक रमचा ट्वीस्ट देऊन माझे व्हेरिएशन बनवले. रम अशासाठी की कॉकटेल जरा ‘कडक’ व्हावे. 🙂

अ‍ॅप्पी फीझच्या कार्बोनेटेड इफ्फेक्टमुळे आणि त्याच्या रंगामुळे हे व्हेरिएशन मस्त शॅँपेनसारखे दिसते आणि मालिबूच्या मखमली चवीमुळे लागते देखिल. त्यामुळे ह्यासाठी लागणारा ग्लास मी वाइन ग्लास वापरला! (खरेतर शॅँपेनफ्लुट वापरायला हवा, पण सध्या कलेक्शनमध्ये नाहीयेय)

प्रकार मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
मालिबू १ औस (३० मिली)
अ‍ॅप्पल फीझ ३ औस (९० मिली)
बारीक तुकडे केलेला बर्फ
ग्लास वाईन ग्लास

कृती:

ग्लासमध्ये 2/3 बर्फ (क्रश्ड आइस) भरून घ्या.

आता त्यात अनुक्रमे मालिबू, व्हाइट रम, आणि अप्पी फिझ ओतून घ्या.

आता सफरचंदाचा काप सजावटीसाठी ग्लासाच्या कडेला लावून घ्या.

अतिशय मादक आणि चित्ताकर्षक ‘मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल’ तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

पार्श्वभूमी:
Crabby ह्या शब्दाचा Crabbie अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल.

मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे ‘एक मखमली’ टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच ‘उंची’ देऊन जाते.

प्रकार व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
मालिबू २ औस (६० मिली)
संत्र्याचा रस १ औस (३० मिली)
अननसाचा रस १ औस (३० मिली)
बर्फ
ग्लास मॉकटेल ग्लास

कृती:

कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या.

झक्कास आणि क्रॅबी चवीचे ‘क्रॅबी कॉकटेल’ तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर

‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे कलुआ अ‍ॅलेक्झांडर

पार्श्वभूमी:

बायकोकडून गीफ्ट मिळालेल्या कोन्यॅकचा वापर आतापर्यंत फक्त 2-3 मित्रांना टेस्ट करून देण्यापुरताच झाला होता. स्निफ्टर ग्लास आणि क्युबन सिगार नसल्याने मीही अजुन म्हणावी तशी कोन्यॅक चाखलीच नाहीयेय. कोन्यॅक वापरून कॉकटेल बनवायचे मनात होते पण योग जुळून येत नव्हता. आज बाजारात गेल्यावर अमुल फ्रेश क्रीम दिसले आणि एकदम कलुआ आणि कोन्यॅक (ब्रॅन्डी) आठवली. लगेच अमुल फ्रेश विकत घेतले आणि कलुआ अ‍ॅलेक्झांडर करायचे ठरवले.

कलुआ (Kahlúa) ही कॉफी बेस्ड मेक्सीकन लिक्युअर आहे. त्यामुळे, तिच्याअपासून आणि ब्रॅन्डीपासून बनणारे हे ‘कलुआ अ‍ॅलेक्झांडर’ हे ‘Digestifs‘ ह्या प्रकारात मोडते, म्हणजे भरपेट जेवण झाल्यावर घ्यावयाचे पाचक पेय. 🙂 कॉफी बेस्ड लिक्युअर मुळे कॉफ़ीची एक झक्कास चव ह्या कॉकटेलला मिळते आणि ब्रॅन्डीमुळे ती किंचीत तीव्र होते. अतिशय चवदार आणि मादक असते हे कॉकटेल.

प्रकार ब्रॅन्डी आणि कलुआ बेस्ड कॉकटेल
साहित्य
कलुआ (Kahlúa) १ औस (३० मिली)
ब्रॅन्डी (कोन्यॅक) १ औस (३० मिली)
क्रीम १ औस (३० मिली)
बर्फ
चिमूटभर इन्स्टंट कॉफी पावडर (गार्निशिंगसाठी)
ग्लास कॉकटेल ग्लास

कृती:

कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात कलुआ, कोन्यॅक आणि क्रीम ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.

शेक केलेले मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या. चिमूटभर इन्स्टंट कॉफी पावडर ग्लासमध्ये भुरभुरू द्या. (एखादा डिझाइन मोल्ड असेल तर त्यातून एखादे डिझाइन केल्यास उत्तम)

झक्कास आणि चवदार ‘कलुआ अ‍ॅलेक्झांडर’ आहे 🙂

कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

पार्श्वभूमी:

मागे एकदा नचिकेत गद्रेशी कॉकटेल्सवरती गप्पा मारताना कोकम सरबताचा विषय निघाला आणि त्यापासून काही कॉकटेल बनविता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हापासून कोकम सरबतापासून एक कॉकटेल करून बघायला पाहिजे असा किडा डोक्यात वळवळत होता. आता कॉकटेल लाउंजच्या ग्रीष्म लाउंजोत्सवचे औचित्य साधून काही प्रयोग करतना कोकमाचे सिरप दिसले आणि एकदम नचिकेत डोळ्यापुढे आला. बाकी साहित्य धुंडाळल्यावर एक झक्कास प्रयोग करायचे ठरले. प्रयोग ‘उन्नीस बीस’ यशस्वी झाला. (उन्नीस बीस का ते कृतीत कळेल) नावासकट माझे इंप्रोवायझेशन आहे. आता नाव काय द्यावे असा विचार करतना विकीपिडीयावर कोकमाचे इंग्रजी नाव दिसले आणि ते एवढे भारदस्त होते की तेच वापरायचे ठरवले.

आता त्या नावात इंडीका असल्याने ‘टाटा ब्रॅन्ड’ची आठवण होऊन तोंड कडू होईल पण हे स्पायसी कॉकटेल त्यावर लगेच उतारा ठरेल 🙂

साहित्य:

प्रकार व्हाइट रम आणि कोकम रसरबत बेस्ड कॉकटेल
व्हाइट रम १ औस (३० मिली)
कोकमाचे सरबत १ ग्लास
स्वीट आणि सार सिरप १० मिली
चाट मसाला
कोथिंबीर
लिंबाचे काप
मडलर
बर्फ
ग्लास हायबॉल ग्लास

कृती:

सर्वप्रथम हायबॉल ग्लासमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचे 1-2 काप घेऊन मडलरने किंचीत मडल करून घ्या.

‘किंचीत’ हे प्रमाण महत्वाचे आहे. माझे कॉकटेल ‘उन्नीस बीस’ होण्याचे कारण म्हणजे हे मडलिंग, जरा जास्त जोरात मडल केले आणि लिंबाच्या सालीचा कडसरपणा उतरला कॉकटेलमध्ये कारण त्या लिंबाच्या सालीतले ऑईल ‘किंचीत’ प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडले.

आता मडल करून झाल्यावर त्यात रम आणि स्वीट आणि सार सिरप ओतून घ्या.

आता ग्लासात कोकम सरबत टाकून ग्लास त्याने टॉपअप करा. टॉपअप करून झाल्यावर त्यात चिमूटभर चाट मसाला टाकून बार स्पूनने हलकेच मिक्स करून घ्या.

चला तर मग, स्पायसी गार्सिनिया इंडीका तयार आहे. 🙂

कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन

पार्श्वभूमी:

गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व  साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. 🙂

प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल

साहित्य:

वोडका 1.5 औस (45 मिली)
पॅशन फ्रूट लिक्युअर 1 औस (30 मिली)
क्रॅनबेरी ज्युस 4 औस (120 मिली)
पायनॅपल ज्युस 2 औस (60 मिली)
बर्फ
लिंबचा 1 काप सजावटीसाठी
1 स्ट्रॉ
ग्लास हाय बॉल

Cocktail

कृती:

ग्लासमधे बर्फ भरून घ्या.

बर्फाच्या खड्यांवर वोडका ओतून घ्या

आता लिक्युअर आणि क्रॅनबेरी ज्युस वोडकावर ओतून घ्या

मस्त लाल रंग आला आहे ना! 🙂  आता त्यात पायनॅपल ज्युस घाला. कॉकटेला वरच्या भागात मस्त पिवळसर रंग येइल.
लिंबाचा काप घालून सजवा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह  करा किंवा पिऊन टाका.

वर पिवळसर आणि खाली लाल अशा मस्त रंगाचे बे ऑफ पॅशन तयार आहे. 🙂

कॉकटेल लाउंज : ग्रे गूज मार्टीनी (Grey Goose Martini)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ग्रे गूज मार्टीनी (Grey Goose Martini)”

पार्श्वभूमी:
क्लासिक मार्टीनीला दिलेला वोडकाचा ट्वीस्ट म्हणजे वोडका मार्टीनी किंवा वोडकाटीनी हे माहिती होते. पण ही ग्रे गूज मार्टीनी काय भानगड आहे?

ह्या भानगडीची मला ओळख झाली एका चित्रपटातून. माझ्या लाडक्या विल स्मीथचा, माझा एक लाडका चित्रपट ‘हिच’ (होय.. होय, तोच तो! गोविंदा आणि सल्लूचा पार्टनरची सिनेमा ज्यावरून ‘इंस्पायर्ड’ झाला तोच) त्या चित्रपटात हिच (विल स्मीथ) एका शुक्रवारच्या संध्याकाळी बारमधे गेला असताना त्याला एक आकर्षक तरुणी (इव्हा मेंडिस) दिसते. त्याला ती प्रथमदर्शनी आवडते. बारचा बार टेंडर तिच्याबद्दल माहिती देताना सांगतो की तिने ‘ग्रे गूज मार्टीनी’ ऑर्डर केलीय. त्यानंतरचा सीन निव्वळ लाजवाब आहे. पण आत्ता मुद्दा तो नाहीयेय. त्यावेळी ते ‘ग्रे गूज मार्टीनी’ ऐकल्यावर, च्यायला ही काय भानगड असा किडा डोक्यात वळवळला. शोध घेतल्यावर कळले की असे काही ट्रॅडिशनल कॉकटेल नाहीयेय. ‘ग्रे गूज’ ह्या विख्यात वोडका पासून बनवलेले चक्क वोडकाटीनी आहे. बहुदा ग्रे गूज वोडका बनविणार्‍या कंपनीने ब्रॅंड मार्केटिंगसाठी हिच चित्रपटाचा वापर केला असावा.

असो, हे कॉकटेल ह्या ग्रे गूज वोडका वर बेतलेले आहे. एकदम अफाट चवीची ही वोडका, बाटली डीप फ्रीझर मध्ये ठेवून थंड करायची आणि शॉट ग्लास मधून ‘नीट’ शॉट घेत गट्टम करायची घ्यायची. अफलातून फ्रूटी चव आहे, लाजवाब!

प्रकार वोडका मार्टीनी
साहित्य
ग्रे गूज वोडका 2 औस (60 मिली)
ड्राय व्हर्मूथ (मार्टीनी) 10 मिली
बर्फ
ग्रीन ऑलिव्ह सजावटीसाठी
टूथपिक ( न वापरलेली 😉 )
ग्लास मार्टीनी (कॉकटेल)

कृती:

ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर ग्रे गूज वोडका हळूवार ओतून घ्या. त्यात ड्राय व्हर्मूथ टाकून बार स्पूनने हळूवार स्टर करून घ्या. त्यानंतर चील्ड केलेल्या कॉकटेल ग्लासमध्ये ते मिश्रण ओतून त्यात ग्रीन ऑलिव्ह टूथ पिकला अडकवून ग्लासात सोडून द्या.

झक्कास आणि पोटंट ग्रे गूज मार्टीनी तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)

2012 ह्या सरत्या वर्षातला शेवटचा शुक्रवार! एक कॉकटेल का हक तो बनता है।
एका जबरदस्त कॉकटेलनी ह्या वर्षाची सांगता करुयात.

तर ‘कॉकटेल लाउंज’ मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai).

पार्श्वभूमी:

माइ ताइ हे नाव वाचून , “ताइ माइ अक्का विचार करा पक्का” ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय? तर असो, ह्या कॉकटेलची पार्श्वभूमी अगदी चित्तवेधक आहे.

पहिल्या महायुद्धानंतर आणि दुसर्‍या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत अमेरिकेत, युद्धात शस्त्रसामग्री विकून मिळालेल्या अमाप पैशामुळे, अनेक बदल, स्थित्यंतरे होत होती, सुधारणा होत होत्या. अमेरिकन्स नव्या नव्या कल्पनांच्या भरार्‍या घेऊन नवनिर्माणाचे कार्य मनापासून करीत होते. त्याच काळात अमेरिकेत ‘टिकी संस्कृती’चा (Tiki Culture) प्रभाव पडला होता. त्या प्रभावाखाली रेस्तराँ आणि बार ह्यांची रचना पॅसिफिक महासागराच्या दक्षिणेला असलेल्या पॉलिनेशिआ ह्या द्वीपसमूहांतील रेस्तराँ आणि बारच्या धर्तीवर (Polynesian-themed) केली जाऊ लागली. डॉन बीच (Donn Beach) ह्या त्या टिकी पब्ज आणि बार याचा जनक समजला जातो.


(हे छाचि विकीपिडीयावरून साभार)

पुढे व्हिक्टर ज्यूल्स (Victor Jules Bergeron) ह्या इसमाने त्याच्या ‘ट्रेडर विक्स (Trader Vic’s)’ या टोपणनावाने एक टिकी रेस्तराँ आणि बार सॅन फ्रॅंसिस्को, कॅलिफोर्निया येथे चालू केला. हाच व्हिक्टर ज्यूल्स ‘माइ ताइ’ ह्या कॉकटेलचा जनक मानला जातो. पण डॉन बीचने सुरुवातीला हे कॉकटेल हा त्याचाच शोध असल्याचा दावा केला होता. पण त्याची कॉकटेल सामग्री आणि कॉकटेलची चव बरीच वेगळी असल्याने तो दावा पुढे फोल ठरला.

पण मला अजूनही तुमच्या चेहेर्‍यावर असलेले भले थोरले प्रश्नचिन्ह दिसते आहे आणि तो प्रश्नही मला कळतो आहे की, ‘माइ ताइ’ हेच नाव का आणि कसे?

सांगतो! त्याचे काय झाले की व्हिक्टर जुल्सने त्याचा पहिला ट्रेडर विक्स हा रेस्तराँ आणि बार चालू केल्यावर एका दुपारी त्याला त्याचे काही ताहिती मित्र ताहिती आयलंडवरून (पॉलिनेशियामधील एक द्वीप) भेटायला आले होते. त्यांच्यासाठी स्पेशल ड्रिंक म्हणून त्याने, रम आणि कुरास्सो लिक्युअर वर आधारित एक शीघ्ररचित (Improvised) कॉकटेल तयार केले. ते कॉकटेल प्यायल्यावर त्याचा ताहिती मित्र एकदम खूश होऊन ताहितीमध्ये अत्यानंदाने उद्गारला “Maita’i roa ae!“. त्याचा अर्थ ‘Very good! Out of this world!‘ म्हणजेच ‘एकदम फर्मास, कल्पनेपलीकडचे!’. त्याच्या त्या उद्गारांचेच नाव ह्या कॉकटेलला मिळाले, ‘माइ ताइ’.

चला, आता बघूयात ह्या कल्पनेपलीकडच्या कॉकटेलची रेसिपी.

प्रकार रम ऍन्ड कुरास्सो लिक्युअर बेस्ड कॉकटेल
साहित्य
डार्क रम 1.5 औस (45 मिली)
व्हाइट रम 1.5 औस (45 मिली)
क्वांथ्रो (कुरासाओ लिक्युअर) 0.5 औस (15 मिली)
अमारेतो (आल्मन्ड लिक्युअर) 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
ग्रेनेडाइन 10 मिली
बर्फ
लिंबचा काप सजावटीसाठी (अननसाचा असल्यास उत्तम)
ग्लास ओल्ड फॅशन्ड ग्लास

कृती:

कॉकटेल शेकर मध्ये अर्धा शेकर भरून बर्फ भरून घ्या. वरील सर्व साहित्य कॉकटेल शेकर मध्ये ओतून घ्या.
शेकरवर बाहेरून बाष्प येईपर्यंत व्यवस्थित शेक करून घ्या.

आता ते मिश्रण ओल्ड फॅशन्ड ग्लासमध्ये ओतून घ्या. माइ ताइ परिपूर्ण करण्यासाठी ह्या मिश्रणावर डार्क रमचा एक थर असणे जरुरी आहे.
बार स्पून वापरून डार्क रमची एक धार त्या मिश्रणावर सोडून द्या.

आता ग्लासवर लिंबाचा एक काप सजावटीसाठी लावून घ्या.

चला तर, कल्पनेपलीकडचे माइ ताइ तयार आहे 🙂

तुम्हा सर्वांना नविन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नविन वर्षाचे स्वागत ह्या धडाकेबाज कॉकटेलच्या साथीने साजरे करा.

कॉकटेल लाउंज : गोवन समर

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर

पार्श्वभूमी:

मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्‍या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा माझा मित्र नचिकेत गद्रे ह्याच्याशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.

आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी (Cazcar Brand) 2 औस (60 मिली)
कॉइंत्रो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
लिम्का
बर्फ
मीठ
लिंबाचा काप (सजावटीसाठी)
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लावून घ्या.

आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.

आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.

लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.

अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे 🙂

कॉकटेल लाउंज : बार्ने स्नॅच (Barney Snatch)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बार्ने स्नॅ (Barney Snatch)

पार्श्वभूमी:

फार वर्षांपूर्वी पूजा भट आणि नागार्जुन ह्यांच्या एका चित्रपटातल्या गाण्यात मालिबू बघितली होती. तेव्हा कॉलेजात होतो त्यामुळे फक्त बघण्यावर समाधान मानून मोठेपणी कधीतरी मालिबू विकत घ्यायची ठरवले होते. 🙂

ही मालिबू , नारळाचा तडका (ट्वीस्ट) देउन मस्त गोड चव आणलेली कॅरेबीयन व्हाईट रम आहे. एकदम मलमली पोत (Texture) असतो ह्या मालिबूला. उन्हाच्या काहिलीत ‘ऑन द रॉक्स’ मलिबू एकदम मस्त थंडवा देते, एकदम गारेगार.

आजचे कॉकटेल हे ह्याच मालिबूचे, वाढत्या उन्हाळ्यवरचा ‘उतारा’ म्हणून एकदम धमाल आणेल.

प्रकार मलिबू कोकोनट रम बेस्ड कॉकटेल
साहित्य
बकार्डी व्हाईट रम 0.5 औस (15 मिली)
मलिबू कोकोनट रम 0.5 औस (15 मिली)
ब्लु कुरास्सो लिक्युअर 0.5 औस (15 मिली)
ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप) 10 मिली
अननसाचा रस
बर्फ
अर्ध्या लिंबाचे काप
स्ट्रॉ
ग्लास कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि लिंबाचे काप घालून घ्या.

आता ग्लासात अनुक्रमे व्हाइट रम, मालिबू आणी ब्लु कुरास्सो ओतून घ्या.

आता ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इफेक्ट यायला हवा.

आता अननसाचा रस टाकून ग्लास टॉप अप करा.
तळाशी लाल, मध्ये निळा आणि वरती पिवळसर अश्या रंगेबिरंगी  थरांचा माहोल जमून येईल.

चला तर मग, बार्ने स्नॅच तयार आहे. 🙂

रंगीत थरांचा क्लोज अप.