चावडीवरच्या गप्पा – रिटेल बाजार आणि FDI

“हद्द झाली ह्या शिंच्या काँग्रेसची, आता तर काय भारत विकायलाच काढला आहें.”, घारुअण्णा तणतण करीत कट्ट्यावर हजेरी लावत.

“तरी म्हटलेच! अजून असे काय कोणी सरकारी निर्णयावर न घसरता पक्षावर तोंडसुख घेतले नाही”, शामराव बारामतीकर.

“अहो बारामतीकर, तो तुमच्या पक्षाचा चष्मा काढा आणि उघड्या डोळ्यांनी बघा जरा”, घारुअण्णा जरा चिडून.

“अहो घारुअण्णा तुम्ही नेमक्या कोणत्या काँग्रेसबद्दल बोलताय? त्याचं काय आहे, आपल्या शामरावांच्या काँग्रेसची ‘आय’ वेगळी आहे हो, खी खी खी”, इति भुजबळकाका.

“डोंबल तुमचं, अहो वेळ काय, विषय काय आणि तुम्ही पांचटपणा असला करताय”, घारुअण्णा घुश्शातच पुढे म्हणाले, “अहो, रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊन ह्या मनमोहन सिंगाने देश आंदणच दिला की हो परकीय कंपन्यांना, ईस्ट इंडिया कंपनीही अशीच भारतात आली होती”.

“घ्या, कळसुत्री बाहुला! कळसुत्री बाहुला! म्हणून त्यांचे हसे उडवायला तुम्हीच पुढे होतात ना घारुअण्णा? आता चक्क त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी काही ठाम निर्णय घेतला तर त्यावरही तोंडसुख घ्यायला, विरोध करायला तुम्हीच पुढे. हे डबलस्टॅंडर्ड झाले.”, शामराव बारामतीकर.

“ढोल बाजेsss, ढोल बाजेsss, ढोल बाजे ढोल, ढमढम बाजे ढोsssल”, भुजबळकाका जोरात गुणगुणत.

“भुजबळकाका शांत व्हा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देशाच्या नाड्या देणेच झाले हे म्हणजे”, चिंतोपंतांनी चर्चेत तोंड घातले.

“चिंपोपंत, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही हो हाकलवल्या ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या? तेव्हा तुमच्या सरकारचाही रिटेल बाजारात ह्या गुंतवणुकीचा अजेंडा होताच ना!”, शामराव बारामतीकर.

“ढोल बाजेsss, ढोल बाजेsss, ढोल बाजे ढोल, ढमढम बाजे ढोsssल”, भुजबळकाका पुन्हा गुणगुणणे सुरू करत.

“तेव्हाही आमचं म्हणणे, Computer Chips, YES! Potato Chips, NO!! असेच होते. रिटेल मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या घुसल्या तर शेतीमालावर त्यांचे वर्चस्व होईल आणि मग सर्व नाड्या त्यांच्या हातात जातील. शेतकरी अधिक पिचला जाईल आणि भांडवलशाहीला बळी पडेल तो”, चिंतोपंत.

“बरं, बरं! तुमची खरी काळजी ही त्या शेतकर्‍यांची की त्या शेतीमालाच्या नाड्या सध्या हातात असलेल्या शेठजींची हो?”, शामराव बारामतीकर.

“चिंतोपंत , तुम्ही कधीपासून भांडवलशाहीविरोधी झालात. तुमच्या पक्षाने आताही हा जो काही विरोध दर्शवला आहे तो भांडवलशाहीला नाहीच आहे मुळी. जे काही वर्चस्व आणि नाड्या ह्या व्यापारी शेठजींच्या हातात आहेत त्याला उद्भवणार्‍या धोक्याची जाणीव होऊनच हा कळवळा आला आहे.”, भुजबळकाका गुणगुणणे थांबवून.

“अहो भुजबळकाका, कशाचा संदर्भ कुठे लावताय?”, घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, जरा थांबा तुम्ही. इथे बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे येणारी निकोप स्पर्धाच नको आहे. स्पर्धा वाढली की वर्चस्व संपले, दलाली संपली. हीच खरी गोम आहे.”, शामराव बारामतीकर.

“खरं आहे! कृषिक्षेत्राच्या दृष्टीने हा निर्णय चांगलाच असणार आहे. सध्या शेतीमालाच्या उत्पादनानंतर तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत 65-100% जास्त झालेली असते, हे सर्व होते त्यानंतरच्या दलालीमुळे. त्याचे पर्यवसान होते महागाई वाढण्यात.”, भुजबळकका.

“त्यामुळे, शेतकर्‍यांचे नुकसान होणार, एतद्देशीय व्यापारी बुडणार, देश विकला जाणार असे गळे काढत ह्या निर्णयाला विरोध करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.”, शामराव बारामतीकर.

“अहो सोकाजीनाना कसला विचार करताय, लक्ष कुठे आहे तुमचे?”, चिंतोपंत.

“ह्म्म्म.., काही नाही ऐकतो आहे तुमचे सगळ्यांचे, पण एक वेगळाच विचार घोळतो आहे मनात”, सोकाजीनाना.

“आता कसला विचार घोळवताय मनात”, इतका वेळ निमूट बसलेले नारुतात्या.

“हा जो काही सावळा गोंधळ चालला आहे सध्या त्याला राजकारणाचा कुबट वास येतोय. सध्या आर्थिक विकासाला बसलेली खीळ पाहता, GDP ला आलेली मरगळ पाहता, त्या दृष्टीने आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी घेतलेला एक आर्थिक निर्णय म्हणून ह्याकडे का नाही बघू शकत आपण. तो निर्णय एका पंतप्रधानाने घेतलेला आहे, जो एक नुसताच राजकारणी नसून एक निष्णात अर्थकारणीही आहे.”, सोकाजीनाना.

“कॉम्प्युटरयुगाची सुरुवात भारतात होतानाही असाच गोंधळ झाला होता. आर्थिक उदारीकरणाचा, खुल्या आर्थिक धोरणांचा निर्णय घेताना केला गेलेला गोंधळही असाच अभूतपूर्व होता. काय झाले? आज त्याची चांगलीच फळे दिसताहेत ना?”

“अरे, आपण भारतीय स्वतःला प्रयोगशील म्हणवतो ना? मग हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल? हा निर्णय योग्य ठरला नाही तर आर्थिक नुकसानच होईल ना? परकीय आपला पैसा लुटून नेतील एवढेच ना? सध्याचे, आपल्याच स्वदेशी बांधवांनी केलेल्या घोटाळ्यांचे आणि लुटीचे उजेडात येणारे आकडे लक्षात आहेत की विसरलात एवढ्यात? तेवढ्या आकड्यांचे नुकसान व्हायच्या आत तो निर्णय परत फिरवता येऊही शकेल ना! एनरॉन प्रकल्प तिथल्या मशीनरीला गंज चढून बंद पडलाच ना?”

“काही करायच्या आधीच नुसते वाईटच होणार हा असला निराशावाद का धरावा? कृती करूयात आणि त्यानंतर होणार्‍या परिणामांची जबाबदारी स्वीकारूयात. चांगले झाले तर मस्तच. पण वाईट होईल असेही गृहीत धरून त्याच्यासाठी ‘बॅक अप’ प्लान करूयात ना म्हणजे प्लान बी. तो प्लान बी सद्य सरकारने नसेल केला तर तो तसा करावा म्हणून सरकारवर दबाव आणूयात. पण कृती करायचीच नाही म्हणून कसले बंद पाळायचे.”

“बघा बुवा! ‘क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे’ असलं काही बाही मनात येत होतं. हे पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

सर्वांनीच मान हालवत चहाची ऑर्डर देण्यास अनुमती दर्शवली.

कोड ऑफ कंडक्ट

“ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही”? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो.
“काय झाले सक्काळी सक्काळी”, आमचे अर्धांगं.
“अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.”, मी.
“मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.”, उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले.
त्या आवाजाच्या “उंची” वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी समझोता करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले. ”अगं काही नाही गं, हे माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आता सोशल मिडीया आणि तत्स्म संस्थाळांसाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणणार आहे”.
“अरे बापरे, का?”, सौ.
“अगं ते आपले उच्चविद्याविभूषित वकिल आहेत ना कपिल सिब्बल, त्यांना म्हणे राग आला. फेसबूकवर, त्यांचे ‘दैवत’, ज्याच्याशिवाय ह्यांना कोणीही हिंग लावून विचारणार नाही आणि निवडून देणार नाही असे ह्यांना वाटते, त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट होतोय आणि त्यावर फेसबूकवाले काहीही करत नाहीत? मग त्यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत फेसबूकच्या अधिकार्‍यांना बोलावले. त्यांच्या वकिली भाषेत समजावून सांगीतले. पण फेसबूकवाले काही बधेनात. त्यांच्या (फेसबूकवाल्यांच्या) म्हणण्यानुसार त्यांच्या पॉलिसीप्रमाणे जर मजकूर आक्षेपार्ह नसेल तर फक्त विवादास्पद आहे म्हणून ते मजकूर सेंन्सॉर करणार नाहीत.

आता आला सिब्बलांना राग. मी एक मंत्री आणि माझे ऐकत नाही? बघतोच आता. लगेच ह्यांना ‘आपल्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी’ आठवली. म्हणे आमच्या स्थानिक लोकांची सेन्सेबीलिटी जपण्यासाठी आम्हाला काहीतरी करणे आवश्याक आहे. अरे, आमचे स्थानिक लोक म्हणजे कोण? तर ते म्हणजे, सत्ताधारी पक्षातील सत्तधीश बरं का.

आम जनता देशात रहाते, तीही स्थानिक आहे, तीला काही सेन्सेबिलिटी असते हे ह्या सत्ताधुंदाच्या गावीही नाहीयेय. संरक्षण ह्यांच्या हिताचेच हवेय. आम जनता काय जगतेय कशीही. जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवा, जनता काटकसर करून जगते आहेच.

बॉम्बस्फोटात लोकं मरताहेत, जे बॉम्बस्फोटं करताहेत त्यांच्या धर्माचे राजकारण होऊन त्यांना पोसतो आहोतच. त्या धारातीर्थी पडलेल्यांच्या नातेवाईकांना काय सेंसिबीलीटी असते? ते आम जनता आहेत. ते थोडीच स्थानिक सत्ताधीश आहेत? ते थोडीच बाहेरून येवून स्थानिक झालेले आहेत. त्यांना भावना नसातात. असल्या तरीही त्यांनी त्या मोकळ्या करायचा नाहीत.

पण तरीही तुम्ही तुमच्या भावनांना मोकळी वाट केलीत तर हे स्थानिक सत्ताधिश ‘कोड ऑफ कंडक्ट’ आणणार. ह्यांना काळजी फक्त ह्यांच्या हक्कांची, सोयीची. पण ज्या जनतेने त्यांना तीच्या सोयी पहाण्यासाठी निवडून दिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे आत्ममग्न हे. म्हणुन म्हणालो की ही लोकशाही आहे कि सरंजामशाही”. असे म्हणत बायकोकडे बचितले तर ती मुलाचा डबा भरण्यात आत्ममग्न.

म्हणजे मी हे सगळे इतका वेळ भिंतीशीच बोलत होतो?
“अगं, आपले व्यक्तिस्वातंत्र्य डबाबंद व्हायची वेळ आलीय, भाजीपोळीचा डबा काय भरते आहेस.” मी जरा चिडूनच बोललो.

“द्या मग चिरंजीवांना १०० ची नोट आजपासून रोज”, सौ.
मी लगेच तडकलो, “अरे आमच्या वेळी १० रुपयाची नोट मिळायची मारामार आणि ह्यांना नुसते खायला १०० रुपये?”

मग मुलगा म्हणाला, “पिताश्री, ते १०० रुपयांच जाउदे. आत्ता एवढे चिडून कपिलअंकलना नाही नाही ते बोलत होतात. पण एका गोष्टीकडे तुम्ही त्यांच्यासारखेच आणि तसेच सोयिस्करीत्या दुर्लक्ष करता आहात. व्यक्तिस्वातंत्र्य काय फक्त मोठ्यांनाच असते? आम्हा मुलांना नसते? तुम्ही आमच्यासाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ लावायला मोकळे आणि जर हेच तुमच्या बाबतीत घडले तर लगेच गळे काढणार तुम्ही?”

आयला, मुलगा आता मोठा होउ लागलोय हे विसरलोच होतो मी.
लगेच वाफाळत्या चहाच्या वाफेमागे चेहरा लपवून; माझ्या रागाची वाफ त्या चहाच्या वाफेत मिसळवून पेपर वाचण्यात मग मीही ‘आत्ममग्न’ झालो.

शरद पवारांवर शारिरीक हल्ला

आज दुपारी शरदपवारांवर शारिरीक हल्ला करण्यात आला. वाढत्या महागाईला शरद पवारांना जबाबदार धरून एका शिख युवकाने हल्ला केला. हरविन्दर सिंह याने पवारांच्या श्रिमुखात भडकावली.
एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्याकडील कृपाण काढून एक गर्भित धमकीही देण्याचा पकार केला.