मॉरिशस सफरनामा (२)

>> मॉरिशस सफरीची सुरुवात तर एकदम ‘फर्स्ट क्लास’ झाली होती…

बिझनेस क्लासमधल्या आरामदायी सीट्सवर विराजमान झाल्यावर सहज बायकोला म्हणालो की एअर मॉरिशसचा एक मेल आला होता ऑफिशियल अपग्रेडसाठी. त्यासाठी 19,650 रुपयांपासून पुढे बोली लावायची होती आपल्या किमतीची. लिलाव संपला की त्याची बोली जास्त त्याला अपग्रेड मिळणार होता. त्यावर बायको एकदम खूश होऊन म्हणाली, “अरे व्वा! म्हणजे तेवढे पैसे वाचले आपले? मस्तच, आता तेवढ्या पैशाची शॉपिंग करता येईल!” ते ऐकून मला घाम फुटला आणि मी पाय लांब करून, पांघरूण डोक्यावर ओढून, पुढचे सगळे बोलणे ऐकायचे टाळण्यासाठी झोपेचे सोंग घेतले. त्या सोंगेच्या झोपेतच मला इथवरचा प्लॅनिंगचा सर्व प्रवास आठवत होता…

मार्चमध्ये, दिवाळीच्या सुट्टीत मॉरिशसला जायचे नक्की केल्यावर सर्व ऑनलाईन टूर एजंट्सकडच्या टूर्सची माहिती करून घेणे चालू केले. साधारण ‘फ्री फॉरमॅट’ असलेली गाईडेड टूर घ्यायची असा प्लान होता. केसरी ट्रॅव्हल्सवर पहिल्यांदा चेक केले. यांच्या सगळ्या टूर्स भयानक महाग आहेत. त्यांना असे का विचारले तर म्हणाले मुंबईपासून ‘टूर लीडर’ तुमच्या बरोबर असणार. म्हणजे च्यामारी, त्या ‘टूर लीडर’चा जायचा यायचा खर्च, राहायचा खर्च आमच्या बोडक्यावर. आणि हा टूर लीडर करणार काय? तर, प्रवासात तुमचे हवे नको पाहणार. च्यायला मग एअर होस्टेस काय करणार? त्यामुळे केसरी टूर्स ड्रॉप केले. परत येताना एक केसरीचा ग्रुप आमच्या बरोबर होता. त्यांचा टूर लीडर चक्क बिझनेस क्लासने प्रवास करत होता. च्यामारी, प्रवासी मंडळ इकॉनॉमी मध्ये आणि ‘प्रवासात तुमचे हवे नको पाहणारा’ टूर लीडर बिझनेस क्लास मध्ये! लैच भारी प्रकार.

आणखीनं एक दोन टूर्सवाले 4 आणि 5 स्टार रिसॉर्टची नावे सांगून पॅकेजीस सांगत होते. मग मीच कुठे राहायचे आणि कुठल्या रिसॉर्ट मध्ये ते ठरवायचे ठरविले. त्यानुसार नेटवर ‘ट्रीप अ‍ॅडवायझर’ आणि तत्सम साईट्स वर शोध घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या रिसॉर्टबद्दलचे रिव्ह्यू आणि फोटोज बघत शोध चालू ठेवला. जनरली खाण्यापिण्याबद्दल भारतीयांचे रिव्ह्यू वाचून रिसॉर्टचे रेटिंग ठरवायचो. ज्या रिसॉर्टला जास्त शिव्या ते जास्त चांगले, असे रेटिंग. कारण जनरली हे रिव्ह्यू देणारे शाकाहारी असायचे आणि भारतीय जेवण नसल्याची तक्रार करणारे हे रिव्ह्यू असायचे. मला भारताबाहेर, स्थानिक डेलीकसीज, स्पेशियालीटीज आणि कॉंटीनेंटल, असे, जे खाणे आपण जनरली करत नाही ते ट्राय करायला आवडते. सर्व्हिसबद्दल युरोपियन लोकांचे रिव्ह्यू वाचून रिसॉर्टचे रेटिंग ठरवायचो, खास करून ब्रिटिश. यांच्याकडून चांगले रिव्ह्यू आलेले असले म्हणजे सर्व्हिस चांगली असणार याची खात्री.

लोकेशन (चित्र आंतरजालावरून साभार)

शोधता शोधता, ‘जलसा बीच रिसॉर्ट’ हाताशी लागले. मॉरिशसच्या ईशान्येला (नॉर्थ-ईस्ट) असलेले एक सुंदर रिसॉर्ट. ह्या रिसॉर्टला लागून सफेद वाळूचा सुंदर प्रायव्हेट बीच आहे ज्यावर फक्त रिसॉर्टमध्ये राहणारेच जाऊ शकतात. ह्या रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीचचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हींचा आनंद घेता येतो. रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमधून निळ्याशार समुद्राचा देखावा अगदी सुंदर दिसतो. समुद्राच्या खार्‍या पाण्यात डंबून झाल्यावर, शॉवर घेऊन नैसर्गिकपणे गरम झालेल्या स्विमिंग पुलामध्ये बसून, स्विमींगपूलाला लागून असलेल्या बारमधून एक मस्त मादक आणि चवदार कॉकटेल चाखत बायकोबरोबर गप्पा मारायचे माझे स्वप्न ह्या ‘जलसा बीच’मध्ये पूर्ण होताना दिसत होते, ह्या रिसॉर्टचे फोटो बघून.

आता रिसॉर्ट फायनल झाले. त्यानुसार आता, मला हव्या असलेल्या तारखांना आणि माझ्या खिशाला परवडणारे पॅकेज देणार्‍या टूर एजंट्सचा शोध चालू केला. बर्‍याच जणांचे जलसा बीच बरोबर टाय-अप नसल्याने त्यांनी त्यांच्या टाय-अप असलेल्या रिसॉर्टची पॅकेजिस विकायचा प्रयत्न केला. पण माझे रिसॉर्ट आता फायनल झाले होते. गोआयबिबो.कॉम, यात्रा.कॉम आणि मेकमायट्रीप.कॉम ह्या तीन टूर एजंट्स पर्यंत आता शोध सीमित होऊन ह्या तिघांपैकी एक ठरवायचा होता. चार्जेस सर्वांचे थोड्या फार प्रमाणात सारखेच होते. टूर डिटेल्स मागविल्यावर कळले की यात्रा.कॉम टूर्सबरोबर गेल्यास प्रत्येक ठिकाणी एंट्री चार्जेस आपल्याला भरायचे होते. मत ते कटाप झाले. गोआयबिबो.कॉमच्या पॅकेजमध्ये फक्त ब्रेकफास्ट समाविष्ट होता आणि टूर मध्ये आयलंडची टूर नव्हती. मेकमायट्रीप.कॉमचे पॅकेज त्यांच्यात सर्वसमावेशक वाटले.

पहिल्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ.
दुसर्‍या दिवशी उत्तर मॉरिशसची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गायडेड सहल.
तिसर्‍या दिवशी दक्षिण मॉरिशसची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गायडेड सहल.
चौथ्या दिवशी Ile Aux Cerf ह्या आयलंडची सफर, ह्या आयलंडवर वॉटर स्पोर्ट्सची रेलेचेल आहे. जे आपल्या खिशाला परवडेल ते आपापल्या पैशाने करायचे.
पाचव्या दिवशी रिसॉर्टमध्ये मोकळा वेळ, चेक आऊट आणि एअर पोर्टासाठी प्रस्थान

असे पाच दिवस आणि चार रात्रींचे जंगी पॅकेज होते. एअर मॉरिशसने प्रवास, एअर पोर्टापासून रिसॉर्ट टू अ‍ॅन्ड फ्रो पिक अप आणि ड्रॉप, मॉरिशसमधले सर्व टूरबरोबर फिरणे हा प्रवासखर्च पॅकेजमध्ये समाविष्ट. सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण, रिसॉर्टच्या रेस्तरॉंमध्ये, पॅकेजमध्ये समाविष्ट. हे सर्वसमावेशक पॅकेज होते. म्हणजे आता अतिरिक्त खर्च फक्त दुपारच्या जेवणाचा आणि Ile Aux Cerf ह्या आयलंडवर असलेल्या वॉटर स्पोर्ट्सचा होणार होता. दुपारच्या जेवणासाठी बरोबर भरपूर खाद्यपदार्थ घ्यायचे ठरवले आणि तो खर्चपण आटोक्यात आणला. 30,000 भरून टूर बुक करायची आणि जायच्या 20 दिवस आधी बाकीचे पैसे भरायचे होते. हेच ते 30,000, नॉन रिफंडेबल असलेले. 🙂

हे सर्व आठवत असताना… अनाउंसमेंट झाली की आता 10 – 15 मिनिटात मॉरिशसच्या ‘सर शिवसागर रामगुलाम (Sir Seewoosagur Ramgoolam)’ विमानतळावर लॅन्डिंग होईल, त्यासाठी सर्व प्रवाशांनी तयार व्हावे. मी ही लगेच कॅमेरा सरसावून तयार झालो.

विमानतळा नजीकचा विहंगम नजारा

विमानतळा नजीकच्या गावातला विहंगम नजारा

विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसरकडे पासपोर्ट दिला. त्याने परतीचे तिकीट मागितले मी त्याला दिले. त्याने पासपोर्टवर काही नोंदी केल्या आणि पासपोर्ट परत दिला. मी त्याला ‘ऑन अरायव्हल विसा‘साठीचा काउंटर कोठे आहे ते विचारले तर मस्त हसून म्हणाला, “30 दिवसांच्या विसाचा स्टॅम्प मारला आहे पासपोर्टवर”. मी एकदम फ्लॅटच झालो. मी त्याला म्हटले की विसासाठी फोटो लागतील असे सांगितले होते. फोटो देऊ का? असे विचारले तर ती जुनी पद्धत होती असे कळले. मोफत ऑन अरायव्हल विसाचे हे सर्व सोपस्कार फक्त 5-7 मिनिटात पार पडून बाहेर पडायच्या लॉबीत आलो कसे तेही कळले नाही. मग एक्सचेंज काउंटरवर जाऊन 5000 भारतीय रुपयांचे मॉरिशियन रुपये करून घेतले. (1 मॉरिशियन रुपया = 2 भारतीय रुपये)

बाहेर आलो तर आमच्या रिसॉर्टच्या कंपनीचा माणूस बोर्ड घेऊन उभा होता. तो म्हणाला अजून 4-5 फॅमिली येणार आहेत पलीकडच्या असेंब्ली पॉइंटजवळ जाऊन बसा. सर्वजण आले की तो अनाउंसमेंट करणार होता. थोड्या वेळात एका ‘मोठा’ घोळका, तेवढाच मोठा आवाज करत असेंब्ली पॉइंटजवळ आला आणि कळले की ते सर्व गुज्जूभाई आणी बेन आमच्या बरोबर रिसॉर्टला येणार आहेत. एक नवविवाहित दांपत्यदेखील होते पण ते मुंबैस्थाइक सौदिंडीयन (शेट्टी) जोडपे होते. बस रिसॉर्टकडे निघाली आणि सर्व गुज्जूभाई आणि बेन यांनी पिकनिकाची गाणी म्हणायला सुरुवात केली. विमानात झोप झाली असल्याने ती गाणी ऐकून एकंदरीतच सुट्टीचा आणि सहलीचा माहोल तयार झाला आणि मग गुज्जूभाई आणी बेन यांची ओळख करून घ्यायला सुरुवात केली. त्या पाच गुज्जू फॅमिली दरवर्षी कुठल्यातरी परदेशाचा दौरा एकत्र करतात असे कळले. मुंबईला त्यांच्या फॅक्टर्‍या आहेत, त्यांतील 2-3 जण पार्टनर आहेत हे देखिल कळले. त्यातल्या एका शहाभाईंनी मला विचारले तुम्ही काय करता? सर्व्हिस का? शपथ सांगतो, ‘असा मी असामी’तल्या ‘चोक्कस!’ असे म्हणणार्‍या गोवर्धनभाईंची आठवण झाली. पण मी लगेच घाटी असल्याचा फील न आणता माझ्या जॉबला ग्लोरिफाय करून सांगितले. पण त्याच्या चेहेर्‍यावर ‘सर्व्हिस करणारा’ असा भाव जो झाला होता तो तसाच राहिला. तर ते असो, मंडळी चांगली होती आणि निगर्वी होती.

तर तेही असो, जलसा बीच रिसॉर्टला पोहोचल्यावर असा नजारा होता.

(क्रमशः)

औरंगाबाद परिसर – वेरूळ – अजंठा- पैठण (2) : बीबी का मकबरा आणि पाणचक्की

बिबी का मकबरा

ताज महल हा एक भव्यदिव्य मकबरा एका प्रेमी नवर्‍याने (शहजहान) आपल्या बायकोवरच्या (मुमताज) प्रेमाखातर बनवला होता. त्याची प्रतिकृती असलेला आणि त्याच्या रचनेवर बेतलेला ‘बिबी का मकबरा’ मात्र एका मुलाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.

औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने त्याची आई, रबिया दुर्राणी उर्फ दिलरस-बानू-बेगम हीच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. खरंतर आजमशहाला हे स्मारक ताज महल पेक्षाही भव्यदिव्य बनवायचे होते पण औरंगजेबाने दिलेल्या ‘बजेट’ मधे ते शक्य झाले नाही. पण ह्या कलाकृतीची नेहमी ताज महल बरोबर तुलना झाल्यामुळे आणि ताज महल इतके भव्यदिव्य नसल्यामुळे जरा दुर्लक्षीत होउन तेवढी लोकप्रियता नाही मिळाली. ह्या ‘बीबी का मकबर्‍या’ला ‘दख्खनी ताज’ असेही म्हटले जाते.

प्रवेशद्वारावर असलेला हा माहिती फलक. बरीच तांत्रिक माहिती दिली आहे त्याच्यावर.

प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावर असलेल्या काळ्या डागांवरूनच पुरातत्व विभागचे काम आणि एकंदरीत पुराणवास्तूंबद्दलची आस्था दिसत होती. त्यामुळे आत काय बघायला मिळेल ह्याची कल्पना येत होती. बीबी का मकबरा हा का दुर्लक्षीत राहिला ह्याचे कारण दिसतेच आहे. तरी बरें इथे यायच्या रस्त्याचे फोटो नाही काढले. असो.

दुरुन डोंगर साजरे ह्याची प्रचिती देणारे हे फोटोज. लांबून काढलेल्या ह्या फोटोंमधून ह्या स्मारकाचे सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे.


हा फोटो मस्त आहे मला खुप आवडतो, मस्त सूर्यास्ताच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकड्रॉपवर उडणार्‍या पक्षांचा थवा मस्त मन मोहवून गेला होता.

बिबी का मकबर्याचे सध्याचे दुर्दैवाचे दशावतार

अतिशय गलथानपणे कामे चालू आहेत. सगळी रया घालवून टाकली आहे ह्या स्मारकाच्या सौंदर्याची.

मी आणि माझी बच्चे कंपनी.

तर, असा हा सो-कॉल्ड सुंदर बीबी का मकबरा बघून पुढे निघालो पाणचक्की  बघायला.

पाणचक्की:

ही पाणचक्की तंत्रज्ञानाचा एक अनोखा नमुना आहे. १० किमी अंतरावरून भूमीगत मातीच्या नळांमधून पाणी ह्या पाणचक्कीत आणून ‘सायफन‘ पद्धातीने वर चढवून या पाण्याचा एक गतिमान प्रवाह तयार केला आहे. ह्या गतिमान प्रवाहापासून उर्जा तयार करून एक भव्य लोखंडी पंखा त्या उर्जेवर फिरवला जातो. ह्या पंख्यावर एक जाते बसवले आहे हे ह्या टर्बाईन सदृश्य पंख्यामुळे फिरते. हीच ती पाणचक्की, पाण्याच्या जोरावर फिरली जाणारी चक्की. इथे एक कृत्रिम धबधबा तयार केलेलाआहे. त्या धबधब्यामुळे इथेले वातावरण एकदम थंड असते. अगदी एअरकंडीशनरच्या कूलिंग प्रमाणे थंडगार. औरंगाबादच्या गरमागरम हवामानात हा पाण्याचा नैसर्गिक थंडावा खरंच गार करतो आपल्याला.

बाबा-शाह-मुसाफिर हे एक सुफी संत ह्या पाणचक्कीवर पीठ तयार करून एक अन्नछत्र चालवत अही एक कहाणी आहे. ह्यांचा एक दर्गा ही आहे ह्या पाणचक्कीच्या परिसरात.

पाणचक्कीला पोहोचे पर्यंत खुपच काळोख झाला होता. त्यामुळे फोटो आले पण ते इथे टाकण्यासारखे नाही आलेत. 😦 पण एक व्हिडीओ घेतलाय ह्या पाणचक्कीचा.

क्रमश: (पुढे-> वेरूळ)

हानाबी (花火)

जपानी माणूस हा हाडाचा ‘सोशिअल ऍनिमल’ आहे. काहीतरी कारण शोधून जथ्थ्याने एकत्र येउन साके आणि खासकरून बीयरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत जीवनाचा आनंद लुटणॆ हे त्यांच्या रक्तातच आहे. असाच एक सामजिक सोहळा म्हणजे हानाबी – ‘फटाक्यांची आतिषबाजी’. हे जपानी फारच कलासक्त असतात त्यांची लेखी लिपी ‘कांजी’ हे त्याचे प्रतिक आहे. एक कांजी म्हणजे एक शब्द असतो. ह्या कांजी एकापुढे एक जोडून नवीन शब्द तयार होतात.
हानाबी, 花火 हा शब्द हाना (花) म्हणजे फुल आणि बी (火) म्हणजे आग ह्या दोन कांजींनी बनला आहे त्याचा अर्थ – आगीची फुले. किती छान आणि कलात्मक शब्द बनवला आहे.

खरतर आपल्या देशातील कसल्याही क्षुल्लक कारणासाठी केलेली आतिषबाजी बघितलेल्यांना हे काय फॅड ब्वॉ? असे वाटू शकेल, पण रूढीप्रिय जपानमधे फारच गाजावाजा करून हानामी साजरी केली जाते. घरे बांधण्यासाठी केलेल्या लाकडाच्या मुबलक वापरामुळे जपान तसा नेहमी आगीच्या धोक्याखाली असणार देश आहे. त्यामुळॆ कदाचित फटाके वाजवण्यावर प्रचंड बंधने येउन ‘फटाक्यांची आतिषबाजी’ साजरी करण्यासाठी हानाबी चालू झाली असावी (हे माझे मत). खरेतर जपान्याला काहीतरी करून सर्वांबरोबर एकत्र येउन दारू रिचवण्याचाच शौक जास्त, काहीतरी कारण हवे 🙂

तर जपान मधे उन्हाळ्यात जुलै एंड किंवा ऑगस्ट सुरुवातीला ही हानाबी प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीतील नदीकाठी ही हानाबी साजरी केली जाते.

हानाबीची सुरुवात जपानी माणसासाठी आदल्यादिवसापासून सुरु होते. आदल्या रात्री जाउन जागा आरक्षित करावी लागते. महत्वाचे म्हणजे त्या आरक्षित जागेवरून अजिबात भांडणे होत नाहीत. आरक्षण न केलेल्या जोड्प्यांना आनंदाने सामावून घेतले आते. साकेचा आणि खासकरून बीयरचा (उन्हाळा असल्यामुळे) अंमल जपन्याला ‘रगेल’ न बनवता ‘रंगेल’ बनवतो.

ह्या नीळ्या ताडपत्री म्हणजे आरक्षित केलेली जागा.

दुपारच्या जेवणानंतर जपानी मंडळी हळूहळू नदीकिनार्याnवर जमू लागते आणि आरक्षित केलेल्या जागेवर स्थानापन्न होउ लागते (अजिबात भांडणे न होता). जनतेचा अफाट सागर नदीच्या दुतर्फा दुपारच्या उन्हातच जमा होउ लागतो.

आता फटाक्यांची आतिषबाजी तर रात्री होणार मग दुपारपासून गर्दी का असा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिकच आहे. पण असा प्रश्न ‘पिण्यासाठी जन्म आपुला’ हे ब्रीदवाक्या असण्यार्याा जपान्याला पडणॆ शक्यच नाही. बीयरच्या बाटल्या रिचवत, आनंदाने कलकलाट करीत रात्रीचा अंधार होण्याची वाट बघत असतात (आतिषबाजी बघण्यासाठी हो, हे नमूद केलेले बरे ;)). अंधार जेवढा जास्त उशीर करून येइल तेवढे चांगले, तेवढीच बीयर जास्त ढोसता येते 😛

आता सर्वच जण एवढीssss ढोसतात की पोट ‘रिकामे करणे’ आलेच, त्यासाठी पोर्टेबल कमोड्सची सोय केलेली असते.(खालील फोटोमधे लाल खूण असलेली जागा.) हा फोटो टाकण्याचे कारण म्हणजे ह्या पोर्टेबल कमोड्स समोर असलेली ही तोबा गर्दी, रांग दुपारपासून जी लागलेली असते ती हानाबी संपली तरी तेवढीच असते 🙂 🙂 🙂 काही महाभाग असे असतात कि त्यांचा हानाबी सोहळा त्या पोर्टेबल कमोड्सच्या रांगेतच संपून जातो 😉

आता अंधार पडू लगतो आणि चालू होते हानाबी (花火) – ‘फटाक्यांची आतिषबाजी’. चोहोकडुन मग फक्त एकच ललकारी ऐकु येउ लागते “सुगोइ किरेssss, सुगोइ किरेssss”. जपानी ललना तर अक्षरशः चिरकत असतात (बहुतेक पोटातली बियर चिरकत असावी ;))

मला स्वतःला ही हानाबी तितकीशी आवडली/आवडत नाही, पण अनुभव म्हणून फार छान सोहळा होता.

बहरीन – मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळ

व्यावसाइक कामानिमीत्त मध्यपुर्वेत, सौदी अरेबीया, रियाधला जाण्याचा योग आला.  मध्यपुर्वेत जाण्याची ही पहिलीच खेप.
थोडीफार उत्सुकता होती या प्रवासाची. पण येण्यापुर्वी गुगलींग केल्यावर फारच निराशा झाली. सौदी अरेबीया, ज्या देशात मुस्लीम बांधवांची मक्का आणि मदीना ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, हा देश पुर्णपणॆ कुराण्यातल्या ‘शरिया’ तत्वांवर चालतो. शरियाच्या पुर्ण कलमांचे (कायदे) काटेकोर पालन केले जाते. गैर मुस्लीमांसाठी जाचक असे खालील मुद्दे

1. सर्व स्त्रियांनी बुरखा (अबाया) घालणे अनिर्वार्य. (हा कायदा धर्मातीत आहे)
2. सार्वजनीक ठिकाणी स्त्री आणि पुरुष  एकत्र येणे निषिद्ध
3. स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी जाताना पुरुषाबरोबर (पती अथवा वडील) असणे बंधंकारक
4. जगातील एकमेक देश जिथे मुव्ही थिएटरवर कायद्याने बंदी
5. दारू पिणॆ / बाळगणॆ कायद्यानुसार निषिद्ध (पकडले गेल्यास शिक्षा भय़ंकर)
6. 5 वेळॆच्या नमाजच्या वेळी दुकाने / मॉल्स  कायद्यानुसार बंद
7. मुतव्वा हे धार्मिक पोलिस नमाजच्या वेळी बाहेर फिरणार्‍या कोणालाही पकडून मशिदीमधे घेउन जाउ शकतात
(माझ्या  एका मित्राला नेले होते, बिचारा सांगुन सांगुन थकला कि तो मुस्लीम नाहीयेय 😦 )

पहिल्या 4 गोष्टींवर आणि शेवट्च्या 2 गोष्टींवर मला जास्त काही  हरकत नव्हती /  नाहीयेय, पण नंबर पाच हा मुद्दा माझ्यासाठी फारच जाचक होता. कसे होणार ह्या विवंचनेत असतनाच कळले की माझा व्हिसा ज्या प्रकारचा होता त्याने मी फक्त एक महीना सौदी अरेबीया, रियाध राहु शकतो. एका महिन्यानंतर व्हिसा एक्सटेंशन साठी सौदीबाहेर जाउन येणे बंधंकारक होते.  बहरीन हा एक शेजारी देश जिथे प्रवेशतत्वावर 72 तासांचा व्हिसा मिळतो, तिथे व्हिसा एक्सटेंशन दर एका महिन्यानंतर जावे लागणार होते. मग बहरीन वर गुगलींग करणॆ आलेच. ते केल्यावर जे कळले त्याने आनंद गगनात मावेना.

बहरीन हा मुस्लीम देश असुनही पुर्ण मुक्त देश आहे. मेट्रोपोलीटन संस्कृती आपलीशी केलेला एक सुंदर देश. महत्वाचे म्हणजे सौदीतल्या पाचव्या मुद्याला फाटयावर मारणारा देश. मला तर तो मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे भासला 🙂

सौदीतील जनता बहरीनला विकांताला (Weekend) बहरीनला जीवाचे बहरीन करण्यास जाते. त्यांच्या साठीही तो देश सौदीतील जाचक नियमांमुळॆ  मृगजळच आहे.  सौदीच्या सुल्तानाने सौदी आणि बहरीन ला जोण्यासाठी समुद्रावर एक पुल बांधला आहे, जो विकांताला जास्तीत जास्त वापरला जातो 😉

सौदी ते बहरीन हा 480 ते 500 किलोमीटरचा प्रवास आहे. भर वाळवंटातुन हा प्रवास करावा लागतो. आजुबाजुला प्रेक्षणीय काहीही नसल्यामुळॆ हा प्रवास फारच रुक्ष होतो, पण बहरीन गाठायच्या कल्पनेनेच तो सुसह्य होतो.सौदीतुन बहरीनला जाण्याचा समुद्रावरील रस्ता फारच छान आहे. सौदीमधे एकंदरीतच इंफ्रास्ट्रक्चर फार छान आणि अद्यावत आहे. सर्व रस्ते अमेरिकेच्या धर्तीवर आणि आंतरराष्ट्रीय नॉर्म्सचे काटेकोर पालन करणारे आहेत.

480 किमी अंतर कापल्यावर, हा सुंदर रस्ता आणि पूल पार केल्यावर दिसतो बहरीनचा स्वागत फलक. इथे ‘या आपले स्वागत आहे’ ‘बहरीन वेल कम्स यु’ असला काही प्रकार दिसला नाही. पण त्याचे काही वाटून घेतले नाही, सौदीमधुन घटकाभर सुटका करून देणार्‍या देशात स्वागत फलकापेक्षा जे हवे होते ते मिळणार होते आणि स्वागत फलकापेक्षा त्याचे महत्व कैक पटीने जास्त होते 🙂

सुंदर बहरीन शहर

बहरीनमधल्या सुंदर इमारती. अत्याधुनिक आणि अद्यावत आर्किटेक्चर वापरून बांधलेल्या इमारती मला फारच आवडल्या. ह्या बहरीनच्या राजेशाही कुटुंबाच्या कलात्मकतेची जाणीव करून देण्यार्‍या आहेत.

बहरीनचे राजे आणि राजकुमार, ह्यांच्या संमतीशिवाय इथे झाडाचे पानही हलु शकत नाही. सौदीच्या राजाशी ह्यांचा राजेशाही घरोबा आहे. बहरीन मधे जेव्हा स्वातंत्र्यासाठी जनतेचा उठाव होत होता तेव्हा सौदीने ह्या राजे आणि राजकुमारांच्या आणि बहरीनच्या संरक्षणासाठी सौदीचे लष्कर बहरीनला रवाना केले होते. (पण बहरीन एवढे मुक्त आहे की तिथल्या जनतेला अजुन काय हवे आहे ते काही मला कळले नाही, असो ते म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, तसे काहीसे असावे)

आणि आता शेवटी सर्वात महत्वाचे, जे काम करण्यासाठी येवढी यातायात केली ते काम ‘मदिरापान’. मी आणि माझा कलीग संपथ मनसोक्त आणि ‘हलेडुले’ होइपर्यंत एका महिन्याचा कोटा पुर्ण करून घेण्यात दंग. पुढचा एक महिन्या ह्या ‘हाय’ वर आणि आठवणींवर काढायाचा होता 😦

असे हे मला भावलेले बहरीन, वाळवंटातले मृगजळ.

हानामी (花見) : साकुरा

हानामी (花見) : साकुरा

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत – मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

साकुरा

वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत. 

जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~

साकुराचा बहर

 

 

हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.

साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.

लाल स्वेटरमधे मी व सौ आणि माझे दोन बछडे जीवाचा साकुरा करताना 😀

हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव 🙂

बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य

माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. 0:)