माझी अमृतमहोत्सवी शाळा – मनोगत

माझी शाळा, काशिदास घेलाभाई हायस्कूल, २०१७ मधे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने २३ एप्रिलला शाळेत एक भव्य सोहळा आयोजित केला होता. ७५ बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन हा सोहळा कसा भव्य करता येईल ह्याचे आयोजन करीत होते. सोहळा भव्य झाला. ह्या सोहळ्याचे ‘लाइव्ह टेलीकास्ट’ singetdigital.comह्या वेबसाइटवर केले होते.

ह्या सोहळ्यानिमित्ताने एक स्मरणिका काढण्याचे ठरले होते. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मनोगते मागवली होती. त्यासाठी माझे दिलेले मनोगत. 

अमृतमहोत्सवी वर्ष २०१७

काशिदास घेलाभाई हायस्कूल

“अरे ये ‘आयसोमेट्रिक व्ह्यू क्या होता है रे?”

“वो मराठे को पता होगा, उसको आता है| उसको तो ऑर्थोगोनल व्ह्यू भी आता है, टेक्निकल स्कूलसे है ना वो|”

हा भागूबाईला डिप्लोमाच्या पहिल्यावर्षी, ‘इंजिनीयरींग ड्रॉइंग’च्या तासाला नेहमी होणारा संवाद, काशीदास घेलाभाई हायस्कूलच्या अन्नपूर्णा अप्पाजी भट्टे तंत्रनिकेतनचा विद्यार्थी म्हणून छाती गर्वाने फुलवणारा असायचा. दर्जेदार, विलक्षण आणि हरहुन्नरी विद्यार्थी घडवणाऱ्या एका शाळेचा विद्यार्थी असल्याच्या अभिमान दाटून यावा असे कित्येक क्षण आयुष्यात आले आणि यापुढेही येत राहतील ह्याची खात्री काशीदास घेलाभाई हायस्कुलचा एक विद्यार्थी म्हणून मला आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा काळ, ज्या वयात संस्कारांची रुजवात होऊन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, तो असतो शालेय जीवनाचा. प्रत्येकासाठी त्यामुळेच, जिथे व्यक्तिमत्वाची मूलभूत रूपारेखा ठरली जाते, त्या शाळेच महत्व अनन्यसाधारण असतं. आपल्या सर्वांसाठी, म्हणूनच, काशीदास घेलाभाई हायस्कुल, तीच शाळा जी आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, ती आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतला एक महत्वाचा घटक आहे.

घरातल्या लाडावलेल्या आणि उबदार वातावरणात बागडत असलेल्या वयात, जेव्हा शाळा म्हणजे काय ते कळण्याची सुताराम शक्यता नव्हती त्या वयात माझी आणि आपल्या शाळेची बिगर इयत्तेत ओळख झाली. ज्युनियर केजी आणि सीनीयर केजीतल्या शिक्षीकांनी त्यावेळी घरच्या उबदार आरामाचा विसर पाडून शाळेबद्दल आत्मियता वाटावी इतका लळा लावून शाळेशी नाळ घट्ट करून टाकली. त्याच बिगरइयत्तेने आजतागायत जिवलग असणारे मित्र दिले, जे आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाले आहेत.

त्यानंतर प्राथमिक शाळेत मंदा राउतबाई, आठवलेबाई आणि दमायंती नाईकबाईनी चार वर्ष व्यापून टाकली होती. मायेचा जिव्हाळा लावून बालपण आनंददायी करण्यात यांचा मोठा हातभार होता. निबंध, वक्तृत्व ह्यांसारख्या इतर अनेक स्पर्धांमधे सहभागी व्हायला भाग पाडून आजच्या स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगात ताठ मानेने वावरण्याचा पायाच जणू काही त्यांनी घातला. चौथीत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव नोंदवून, हुशार असल्याचा (नसलोतरीही) आव आणून आत्मविश्वासाने कसे वावरावे याची तयारीच जणूकाही करवून घेतली होती.

पहिलीत का दुसरीत असताना दोन मुलींच्यामधे एक मुलगा अशी बसण्याची व्यवस्ठा करून ‘आशेला’ लावण्यार्या ह्याच शाळेने पुढेपाचवी ते सातवी फक्त मुलांचे वर्ग ठरवून सगळ्या ‘रोमॅंटीक आशाआकांक्षांना’ सुरुंग लावण्याचे काम केले आणि ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा मंत्र देऊन, अभ्यास करून आयुष्यात ‘प्रकाश पाडण्यास’ प्रवृत्त केले. सहावीत वर्तकबाईनी हिंदी शिकवून राष्ट्रभाषेवर जे भाषिक अन्याय केले जातात ते करण्यापसून मलादूर ठेवले. सावेसरांनी नागरिकशास्त्र शिकवताना राज्यघटनेतील कलमं इतकी घोटून घेतली की तेव्हापासून राजकारणाचा धसकाच जो बसला तो आजतागायत तसाच आहे. सातवी अ मो राउतसरांनी व्यापून टाकली होती. ‘करडी शिस्त’ ह्याचा अर्थ सातवीत काय तो समजला. पण त्या करड्या शिस्तीमुळेच माझे हस्ताक्षर इतरांना वाचतायेण्या जोगे झाले. राउतसर काळाच्या पुढे होते. नदी समुद्राला जिथे मिळते त्याला नदीचे मुख म्हणतात, पण मुख का? तर नदी समुद्राला मिळते म्हणजे समुद्राचे चुंबन घेते म्हणून ते मुख हे अस समजावून देऊन त्या उमलत्या वयात प्रणयाचे भावाविश्वही मुक्त करून दिले.

आठवीत चुरीसरांनी घातलेल्या बीजगणिताच्या पायामुळेचआयुष्यातली किचकट गणितं सोडवता आली. सराफसर, चोरघेबाई, लता नाईकबाई यांनी मिळून सकलजनांना ‘शास्त्रोक्त’ करून सोडलं. कुलकर्णीसरांनी, चुरीसरांनी घातलेल्या पायावर भुमितीचा कळस चढवला. भूमितीतल्या सिद्धता सिद्ध करायाला शिकवता शिकवता आयुष्यात स्वत:ला सिद्ध करणंही तितकच महत्वाचं कसं हेही ते नकळत शिकवून गेले. मला भाषेशी खेळायला आवडण्याचे आणि भाषेची गोडी लागण्याचे कारणही कुलकर्णीसर! शाब्दिक कोट्या करण्याचं त्यांच कसब वादातीत होतं. आपल्यालाही हे जमलं पाहिजे हा ध्यास त्यांच्या मुळेच लागला आणि त्यासाठी साहित्य वाचनाचा नादही.

शाळेत नुसतं अभ्यास एके अभ्यास अस धोरण कधीच राबवलं गेलं नाही. एनसीसी, समाजसेवा, कार्यानुभव, स्काउट, गाइड असले इतर शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला होता. खेळाला असलेललं महत्व आपल्या शाळेचं वेगळेपण अधोरेखित करतं. विषेशत: खो खो आणि कबड्डी ह्या मैदानी खेळांना प्रधान्य देऊन एक चुरस निर्माण केली होती.

माझे वडील शाळेत शिक्षक असणं हे माझं सुदैव की दुर्दैव हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. त्यांच आपल्याच शाळेत असणं एक वेगळ्याच प्रकारचं दडपण आणायचं माझ्यावर. मला खट्याळपणा(त्यावेळच्या भाषेत ‘राडे’) करायला जास्त जमायचं नाही. पण तरीही जसा जमेल तसा व्रात्यपणा मला माझ्या शाळेत करायला मिळालाच. दहावीला एक दिवस ‘मास बंक’ करणं असो की वर्गात हिंदुत्ववादी भडक सुविचार लिहीण असो. मुलींच्या दप्तरात मुलांची वह्या पुस्तकं अदलाबदल करणं असो की नावडत्या शिक्षकांच्या तासाला नेमकं काही निमित्त शोधून पळ काढणं असो, असले उपद्व्याप बरेच केले.

शालेयजीवनातली ती सोनेरी १२ वर्ष आणि आपली शाळा, आयुष्याचा एक मोठा कोपरा व्यापून आहे. आजही धकाधकीच्या आणि रूक्ष कोर्पोरेट विश्वात जेव्हा कामाचा ताण वाढून बेचैनी होते आणि विचित्र वाटून उदास व्यायला होतं; तेव्हा मी सर्व विसरून एकांतात, वाफाळता कॉफीचा कप हातात घेउन, ते सोनेरी दिवस आणि त्या रम्य आठवणी काढून भूतकाळात डोकावून येतो. ट्रस्टमी, १०-१५ मिनिटांत एकदम मूड फ्रेश होऊन, नवीन आव्हानं पेलायला मन पुन्हा एकदा सज्ज होतं.

आपली शाळा आता अमृतमहोत्सव साजरा करतेय, शतकोत्सवही साजरा करून शाळा चिरायू होईल असा सार्थ विश्वास मला आहे.

‘गो ईस्ट ऑर वेस्ट, के जी हायस्कूल इज द बेस्ट’! थ्री चीयर्स फॉर के जी हायस्कूल!!

– ब्रिजेश मराठे
१० वी ड, १८८९-९०

पुढारी दैनिक आणि वाड्‍ःमयचौर्य

Plagiarism किंवा वाड्‍ःमयचौर्य हा प्रकार ब्लॉगर जगतात ब्लॉगर्ससाठी काही नवीन नाही. त्यापासून सुरक्षा म्हणून कॉपीराईट सुविधा पुरविणाऱ्या बऱ्याच साईट्स पुढे आल्या. बहुतेककरून सर्व ब्लॉगर्स ह्या सुविधांचा वापर ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित करतात. मीही ब्लॉगवरील लेखांचे सर्व कॉपीराईट हक्क सुराक्षित केले आहेत.

पण नुकताच एक धक्का बसला. ‘पुढारी’सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राकडून माझ्या सैराटवरच्या लेखाचे वाड्‍ःमयचौर्य झाले. ‘बॅकसाईड स्टोरी’ ह्या सदरात माझा लेख जसाचा तसा प्रकाशित केला होता.  त्या लेखावर  एक प्रतिक्रिया टाकून  मी  निषेध नोंदवून ह्याबद्दल खुलासा मागवला. त्याचबरोबर संकेत पारधी ह्या मित्राने फेसाबुकवर पोस्ट टाकून हे वाड्‍ःमयचौर्य पब्लिकमध्ये उघड केले.

त्यावर पुढारी कडून त्या लिंकवर माझा नामनिर्देश करणारा खालील चित्रात दिसणारा बदल करण्यात आला. (त्यात वापरलेली मराठी भाषा अतिशय हास्यास्पद आहे)

IMG_4101[1]

तसेच पुढारीच्या वेबअडमीन कडून मेलद्वारेही खुलासा करण्यात आला.

Web Pudhari – webpudhari@pudhari.co.in via rediffmailpro.com
May 20

Dear Sir,
Got your mail regarding the article. This article was published in one of our print edition and so got carried on the website. We have informed this matter to the concern editor who is looking into the issue. Please give us some time to find out who submitted your article to us..
Pls send us your mobile number so that we can get in your touch…

असा अतिशय अश्लाध्य प्रकार पुढारीसारख्या दैनिकाकडून व्हावा हे खरोखर खेदजनक आहे. तसेच संपादकांनी कोणीही दिलेला मजकूर कसलीही शाहनिशा न करता प्रकाशित करावा  हेही निंद्य आहे!

पुढारीने माझा नामनिर्देश करून चूक कबूल केली आहे पण  त्याचा आनंद नाही कारण आता वर्तमानपत्रांचा  वाड्‍ःमयचौर्यरूपी काळ’ सोकावातोय…

ब्लॉग माझा 2012 स्पर्धा आणि माझा ब्लॉग

आज ‘कर्णोपकर्णी’ ह्या शब्दाचा अर्थ मला लागला.  🙂

सप्टेंबर मध्ये ब्लॉग माझा 2012 स्पर्धेची बातमी वाचली आणि त्यात सहभागी होण्याचे ठरवून त्यात भाग घेतला. तो  सहभाग घेताना ‘कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस’ हा कृष्णाच्या भगवतगीतेचा सार अगदी लक्षात ठेवला होता (आता माझे नावच ब्रिजेश [ब्रज  + इश] त्यामुळे हे लक्षात ठेवावेच लागत नाही 🙂  ). त्यामुळे ते विसरूनच गेलो होतो. स्पर्धेच्या फॉर्ममध्ये, ‘फक्त विजेत्यांनाच’ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात  मेलद्वारे स्पर्धेचा निकाल कळविण्यात येईल असा एक मुद्दा दिलेला होता. पहिल्या आठवड्यात काही मेल आले नाही त्यामुळे मग फळाची अपेक्षा सोडूनच दिली होती.

पण आज माझा एक ब्लॉगर मित्र, ज्याला आम्ही प्रेमाने ‘डॉन्राव’ म्हणतो (‘ब्लॉग माझा’ चा पहिल्या वर्षीचा पारितोषिक विजेता), त्याने मला एक मेसेज पाठवून “एबीपी ब्लॉग माझा 2012 च्या स्पर्धेत तुला बक्षिस मिळाले आहे त्याबद्दल अभिनंदन” असा मेसेज पाठवला. तो पर्यंत काही मी पर्सनल मेल्स चेक केलीच नव्हती (ऑफिसमध्ये सर्व पर्सनल मेल्स बॅन्ड आहेत). त्यानंतर बर्‍याच जणांचे एसएमेस आणि फेसबुकवर मेसेज आले.

लगेच मोबाइल वरून मेल चेक केले आणि प्रसन्न जोशी यांचा हा खालील मेल आला होता.

प्रिय ब्लॉग माझा २०१२ स्पर्धक,

 सोबत यंदाच्या स्पर्धेच्या निकालाची प्रत पाठवित आहे.
 हाच निकाल एबीपी माझाच्या www.abpmajha.in या वेबसाईटवर आज संध्याकाळी उशीरा किंवा उद्या सकाळपर्यंत दिसू शकेल.
 फक्त विजेत्यांना पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाबद्दल नंतर कळविले जाईल.
 
आपला,
 प्रसन्न जोशी,
असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर, एबीपी माझा.

हा मेल वाचल्यावर आनंदाला पारावर राहिला नाही कारण ह्या स्पेर्धेत निवडलेल्या दहा उत्तेजनार्थ ब्लॉगमध्ये माझ्या ब्लॉगचा समावेश आहे!
हे नक्कीच अभिनंदनिय तर आहेच पण त्याचबरोबर अजुन चांगले लिहीत रहाण्याची जबाबदारी वाढली आहे ह्याने जरा दडपणही आले आहे.
पण असो, हा आनंद माझ्या लाडक्या ‘लॅफ्रॉंय़’  ह्या सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या साथीने साजरा करण्यात आलेला आहे 🙂

सर्वप्रथम, ही संधी सर्व मराठी ब्लॉगर्सना उपलब्ध  करून दिल्याबद्दल एबीपी माझाचे मनापासून आभार . ह्या स्पर्धेच्या सर्व परिक्षकांचे, वेळात वेळ काढून सर्व ब्लॉग्स (जवळ जवळ दिडशे) वाचून, त्यांतून विजेते निवडण्याबद्दल आभार.

ह्या माझ्या ब्लॉगवरील सर्व वाचकांचे ह्या निमित्ताने मी आभार मानतो.  तुमच्या प्रतिसादांमुळे  आणि वाचनामुळेच लिहीण्याचा हुरुप कायम राहिला आणि काहीबाही नविन लिहीत राहिलो.  मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाचे आणि तेथिल वाचकांचेही आभार, माझी लेखनकला ही तेथेच बहरली आणि तिथल्याच मित्रांच्या प्रोत्साहनाने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कोणाचेही नाव इथे घेणे हा बाकीच्यांवर अन्याय होईल इतके हितचिंतक ह्या एका वर्षाच्या लेखनप्रवासात लाभले आहेत.  त्यामुळे सर्वांचेच आभार.

पण ह्यावेळी माझ्या बायकोचे आभार न मानले तर हा तिच्यावर अन्याय असेल. तिने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळेच हे यश बघू शकतो आहे. त्यामुळे ह्या यशात तिचाही फार मोठा हात आहे. माझ्या लेखांचे प्रुफ रिडींग नेहमी तिच करते. (आता ह्यापुढे माझ्या लेखात काही चुका आढळल्यास दोष कुणाला द्यायचा हे तुम्हाला कळले असेलच 😉 आपला दोष दुसर्‍यांवर कसा ढकलावा हा गुण कॉरपोरेट जगात नक्कीच शिकलोय!) .

तर बायको, तुझे आभार आणि अशीच साथ तु वर्षानुवर्षे देत रहा हीच एकमेव मागणी. (फक्त ह्याच जन्मी बर कां, नाही काय आहे, मलाही तुझी काळजी आहे म्हटलं  😀 )

– आपलाच, ब्रिजेश मराठे