चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

chawadee

आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.

“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.

“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.

“बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.

“अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा डोळे गोल गोल फिरवत.

“बारामातीकर, कुठे आहे तुमचा जाणता राजा ह्या दुष्काळात? आहे का काही त्या माजी कृषीमंत्र्याला शेतकऱ्याचे?”, इति चिंतोपंत.

“अमेय खोपकर ह्या बॉलीवूड सेनेच्या अध्यक्षाने मनसे तर्फे बॉलीवूडला आवाहन केले आहे शेतकर्यांना सढळ हाताने मदत करायला, चांगला काम आहे!”, इति घारुअण्णा.

“अहो घारुअण्णा, हे असे आवाहन की आव्हान? ”, बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका हसत.

“हो ना, कसलं आवाहन न आव्हान, धमकीच म्हणा ना सरळ.”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“बहुजनहृदयसम्राट, अहो जमीन कसून अन्नधान्य पिकवणाऱ्याची काळजी करायला नको का?”, घारुअण्णा तिरमिरीत.

“काळजी तर करावीच ना, पण अशी दुसऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवून?”, बारामतीकर शड्डू ठोकत.

“अहो बारामतीकर, जागृती होतेय हे काही कमी आहे का? पावसाने कंबरडे मोडले आहे.”, इति चिंतोपंत.

“बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकरच ते, तथाकथित बहुजन नेत्यांकडून काही सुरुवात झाली नाही म्हणून विरोध दुसरं काय?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! स्वतः: काय केलेय मदत करण्यासाठी? दुसऱ्यांना वेठीस का म्हणून?”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“हो, हा कळवळा कृष्णकुंजातील गारेगार एसीमध्ये बसूनच आलाय ना? की विदर्भात किंवा मराठवाड्यात बसून आलाय?”, बारामतीकर शांतपणे.

“टोल आंदोलनात मिळालेलं काही द्यायचे की आधी स्वतः:, मग आवाहनं करायची दुसऱ्यांना!”, इति भुजबळकाका.

“ओह्हो! घारुअण्णा, आत्ता माझ्या लक्षात आलं कोण आयजी आणि कोण बायजी ते.”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे जर मदत करतात तर बॉलीवूड कलाकार का करू शकत नाही असा सवाल विचारणारे हे टिकोजीराव कोण?”, बारामतीकर चौकार ठोकत.

“बारामतीकर, तुस्सी सही जा रहे हो!”, नारुतात्या जोरात हसत.

“नाशिकच्या ‘नवणिर्माणा’तूनही काही ‘भले’ झालेच असेल की ते वापरायचे दुसऱ्यांना उपदेश देण्याआधी”, बारामतीकर आवेशात.

“अहो पण हे शिंचे कलाकार कमावतात की खोऱ्याने मग सामाजिक बांधिलकी वैग्रे काही आहे की नाही?”, घारुअण्णा तणतणत.

“ते त्यांचं त्यांना ठरवू द्याना, त्यांची सामाजिक बांधिलकी ठरविणारे तुम्ही कोण? ”, भुजबळकाका हसत.

“अहो पण आपला नाना आणि मकरंद करताहेत ना? त्यांचे बघून तरी काही लाज बाळगायची…”, घारुअण्णा उद्वेगाने.

“किती ती तणतण घारुअण्णा!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“तुम्हीच बघा आता काय ते सोकाजीनाना. मराठी माणसाने मराठी माणसासाठी काही केले की लगेच बहुजनहृदयसम्राट आणि बारामतीकारांचा पोटशूळ कसा उठतो बघा! ”, चिंतोपंत सीरियस चेहरा करत.

“अहो राजने काहीतरी करून पक्षाची मोट बांधली आहे, पदं आणि पदाधिकारी उभे केले आहेत त्या पदाधिकाऱ्यांना काही कामं नकोत का?”, सोकाजीनाना मंद हसत

“आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी हे मनसे पहिल्यांदा करते आहे का? शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करा म्हणजे नेमके काय करा, ती मदत जर बॉलीवूडचे कलाकार करणार असतील तर त्यात मनसेचा काय रोल, ह्या दोन्ही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. ब्लु प्रिण्ट मध्येही हेच केले होते. आता, नाना आणि मकरंद मैदानात उतरून काही करताहेत हे दिसल्यावर अचानक एक विषय मिळाला प्रकाशात यायला. शेतकऱ्यांना पैसे वाटून त्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? त्यांच्या समस्या काय आहेत आत्महत्या करण्यामागच्या त्याचा अभ्यास करून, मुळाशी जाऊन, निराकरणासाठी काही ठोस कार्यक्रम राबवायला हवा ना! तसे करण्याची सोडा, नुसते विचार करण्याची तरी कुवत आहे का? नुसते सढळ हाताने मदत करा असे आवाहन कम गर्भित धमकी देऊन समस्या नाहीशी होते का? नाही! त्याने फक्त ‘उपद्रवमूल्य’ लोकांच्या मनात ठसवता येते आणि हेतू तोच आहे. ‘आम्ही आहोत अजून, आम्हाला विसरू नका एवढ्यात‘, हाच संदेश लोकांच्या मनातफ़ ठसवायचा आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसू तसेच चेहेर्‍यावर ठेवत.

“आणि आपण बसतो आपापली अस्मितांची गळवं कुरवाळत, तथाकथित नेत्यांनाही तेच हवे असते. सोडा तो अकलेचा दुष्काळ आणि चहा मागवा!”, सोकाजीनाना घारूअण्णांच्या खांद्यावर हात टाकत.

सर्वांनीच हसत हसत चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

चावडीवरच्या गप्पा – बळीराजा आणि रामगिरी

chawadee

चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत.

“आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण्णा नाराजीने.

“अहो घारुअण्णा, पण त्यांनी तसे का केले हे तर समजून घ्यायचा प्रयत्न करा ना!”, बारामतीकर जरा सावध होत.

घारुअण्णा“कसले काय हों! काहीतरी फुकटात पदरात पाडून घ्यायचे असेल दुसरे काय?”, घारुअण्णा थोड्याश्या तिरस्काराने.

“नाहीतर काय, कर्जमाफी हवी असेल दुसरे काय?”, नारुतात्या घारुअण्णांची री ओढत.

“नारुतात्या, घारुअण्णा एक आपले फक्त संध्यानंद वाचतात, आता तुम्हीही सध्या संध्यानंद लावलात की काय?”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“का ब्वॉ?”, नारुतात्या.

“अहो! फक्त कर्जमाफीसाठी काहीही झालेले नाही, पेपर वाचला नाहीत का?”, इति बारामतीकर.

भुजबळकाका“आपल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक क्वॉर्टर चौकात व्यवस्थित आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून त्यांनी ह्यांना वेळ द्यावा एवढेच त्यांचे म्हणणे होते.”, भुजबळकाका.

“बरंsss मग पोलिसांशी बाचाबाची करण्याचे काय कारण मग?”, घारुअण्णा रागाने.

“घारुअण्णा, अहो मुख्यमंत्र्यांना म्हणे वेळच नव्हता!”, इति बारामतीकर.

“कुठल्या ‘आदर्श’ कामात गुंतले होते म्हणे आपले माननीय मुख्यमंत्री?”, नारुतात्या.

“पुढे कुठल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे कुठले पितळ आता उघडे करायचे याची चर्चा करत असतील पक्षश्रेष्ठींबरोबर अजून काय!”, बारामतीकर नाराजीने.

“छॅsss ह्या आपल्या बारामतीकरांची दौड आपली इथपर्यंतच…”, घारुअण्णा उपरोधाने.

बारामतीकर
“घारुअण्णा शेतीच्या प्रश्नातले तुम्हाला काय कळते हो?”, बारामतीकर घाव सहन न होऊन.

“व्वा रे व्वा! कोंकणात वाडीत नारळी आणि पोफळीची झाडें आहेंत म्हटले आमची. झालंच तर चार फणस आहेंत.”, घारूअण्णा रागाने लालेलाल होत.

नारुतात्या“अहो घारुअण्णा, त्याला झाडी म्हणतात शेती नव्हे! खी…खी..खी… ”, नारुतात्या पाचकळपणा करत.

“नारुतात्या अहो कसला बाष्कळपणा चालवलाय तुम्ही हा, आहो विषय काय तुमचे चाललेय काय?”, चिंतोपंत जरा तडकून.

“नाहीतर काय, अहो शेतकर्‍यांनी न्याय मार्गाने आपले म्हणणे आणि मागण्या मांडायचा प्रयत्न केला होता.”, भुजबळकाका शांतपणे.

“काय मागण्या होत्या त्यांच्या एवढ्या?”, चिंतोपंत.

“केंद्र सरकारने कापसाच्या आधारभूत किमतीत 20 टक्के दरवाढ किंवा राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या न्यायाकरिता 20 टक्के कापसावर बोनस द्यावा, धान्य उत्पादकांना 3 हजार प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकर्‍यांना 24 तास वीज द्यावी, शेतकर्‍यांचे वीज बिल आणि कर्जमाफी देण्यासह विविध रास्त मागण्या होत्या शेतकर्‍यांच्या.”, बारामतीकर.

“त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चेला वेळ न दिल्यामुळे त्यांनी चिडून त्यांच्या निवासस्थानावर कूच करायचे ठरवले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवायचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांनी त्या बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली.”, भुजबळकाका.

“पण पोलिसांनी परिस्थिती धीराने हाताळल्यामुळे लाठीचार्ज टळला आणि भलतेच काही झाले नाही.”, बारामतीकर सुस्कारा सोडत.

“चला म्हणजे कोणीतरी शहाणपणा दाखवला म्हणायचा!”, नारुतात्या.

“अहो सोकाजीनाना ऐकताय ना, शेतकरी आणि पोलिसांची धक्काबुक्की झालीयेय”, चिंतोपंत.

“हो, ऐकले सगळे! कृषिप्रधान असलेल्या भारत देशात, त्या कृषिप्रधानतेचा पाया असलेल्या बळीराजावर ही वेळ यावी याचेच वैषम्य वाटते आहे.”, सोकाजीनाना कठोर चेहेर्‍याने.

“हे बरीक खरें हों!”, घारुअण्णा.

सोकाजीनाना“अहो, ज्या जनतेचे नेतृत्व करत आहेत त्या जनतेला देण्यासाठी, जनतेचा सेवक असलेले, मुख्यमंत्री यांना वेळ नसावा, ह्या सारखे दुर्दैव दुसरे कोणते असावे? अडत्यांच्या जाळ्यात अडकलेल्या, अठरा ते वीस-वीस तास लोड शेडिंगच्या तडाख्यात अडकलेल्या, कितीही उत्पादन घेतले तरीही कर्जाच्या विळख्यातच अडकून पिचत असलेल्या आणि ह्या सर्वामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍याने जायचे कोणाकडे? त्याच्या मुख्यमंत्र्याकडेच ना? पण त्यांना त्यासाठीही वेळ असू नये? एकीकडे अतिप्रचंड फायद्यासाठी बिल्डरांच्या गळ्यात गळे घालून लागवडीखालची प्रचंड जमीन लाटायची, त्यासाठी बिल्डरधार्जिणे नियम बनवायचे, ह्यासाठी वेळच वेळच असणार्‍यांना, उरलेल्या जमीनत सचोटीने लागवड करून महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या अन्नधान्याची सोय लावणार्‍यासाठी मात्र वेळ नसावा ह्याची खरंच शरम वाटायला हवी.”, सोकाजीनाना गंभीर चेहेर्‍याने.

“असो, झाली घटना काही चांगली झाली नाही! तरीही शेवटी त्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर 30 मिनिटे का होईना पण चर्चेसाठी दिली, जनाची नाहीतरी मनाची लाज वाटून, हेही नसे थोडके! जाऊद्या, चला चहा मागवा!”, सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.