चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)


chawadee

“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात.

“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.

“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.

“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.

“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.

“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.

“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.

“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.

“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.

“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.

“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.

“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.

“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.

“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.

“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.

“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.

“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा ‘यूनिक नंबर’ तुम्हाला देते”, भुजबळकाका.

“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.

“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्‍या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.

“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.

“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.

“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.

“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.

“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.

“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.

“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.

“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.

“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.

“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.

भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.

4 thoughts on “चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

  1. मागे लिहिलंय कि हे कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाहीये जसे काही बांगलादेशी लोक सुद्धा line मध्ये उभे राहून आधार card काढून घेत आहेत आणि सरकारला स्वतः ची guaranty नाहीये

    ह्याचा अर्थ काय घ्यायचा ??

    Like

यावर आपले मत नोंदवा