लाल सिंग चढ्ढा


बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, “नका बघू मग आमचे सिनेमे” ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.

काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.

सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.

सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.

जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे…वगैरे…) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.

सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

यावर आपले मत नोंदवा