2 प्रतिक्रिया

कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica)

पार्श्वभूमी:

मागे एकदा नचिकेत गद्रेशी कॉकटेल्सवरती गप्पा मारताना कोकम सरबताचा विषय निघाला आणि त्यापासून काही कॉकटेल बनविता येईल का? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हापासून कोकम सरबतापासून एक कॉकटेल करून बघायला पाहिजे असा किडा डोक्यात वळवळत होता. आता कॉकटेल लाउंजच्या ग्रीष्म लाउंजोत्सवचे औचित्य साधून काही प्रयोग करतना कोकमाचे सिरप दिसले आणि एकदम नचिकेत डोळ्यापुढे आला. बाकी साहित्य धुंडाळल्यावर एक झक्कास प्रयोग करायचे ठरले. प्रयोग ‘उन्नीस बीस’ यशस्वी झाला. (उन्नीस बीस का ते कृतीत कळेल) नावासकट माझे इंप्रोवायझेशन आहे. आता नाव काय द्यावे असा विचार करतना विकीपिडीयावर कोकमाचे इंग्रजी नाव दिसले आणि ते एवढे भारदस्त होते की तेच वापरायचे ठरवले.

आता त्या नावात इंडीका असल्याने ‘टाटा ब्रॅन्ड’ची आठवण होऊन तोंड कडू होईल पण हे स्पायसी कॉकटेल त्यावर लगेच उतारा ठरेल :)

साहित्य:

प्रकार व्हाइट रम आणि कोकम रसरबत बेस्ड कॉकटेल
व्हाइट रम १ औस (३० मिली)
कोकमाचे सरबत १ ग्लास
स्वीट आणि सार सिरप १० मिली
चाट मसाला
कोथिंबीर
लिंबाचे काप
मडलर
बर्फ
ग्लास हायबॉल ग्लास

कृती:

सर्वप्रथम हायबॉल ग्लासमध्ये कोथिंबीर आणि लिंबाचे 1-2 काप घेऊन मडलरने किंचीत मडल करून घ्या.

‘किंचीत’ हे प्रमाण महत्वाचे आहे. माझे कॉकटेल ‘उन्नीस बीस’ होण्याचे कारण म्हणजे हे मडलिंग, जरा जास्त जोरात मडल केले आणि लिंबाच्या सालीचा कडसरपणा उतरला कॉकटेलमध्ये कारण त्या लिंबाच्या सालीतले ऑईल ‘किंचीत’ प्रमाणापेक्षा जास्त बाहेर पडले.

आता मडल करून झाल्यावर त्यात रम आणि स्वीट आणि सार सिरप ओतून घ्या.

आता ग्लासात कोकम सरबत टाकून ग्लास त्याने टॉपअप करा. टॉपअप करून झाल्यावर त्यात चिमूटभर चाट मसाला टाकून बार स्पूनने हलकेच मिक्स करून घ्या.

चला तर मग, स्पायसी गार्सिनिया इंडीका तयार आहे. :)

यावर आपले मत नोंदवा

कॉकटेल लाउंज : मॅन्गो मार्गारीटा

‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मॅन्गो मार्गारीटा

पार्श्वभूमी:

माझा एक मित्र, नचिकेत गद्रे, याने एकदा गोव्याला फिशरमन व्हार्फ मध्ये मॅन्गो मार्गारीटा ट्राय केली होती. त्याने तसे सांगितल्यापासून ते कॉकटेल एकदम मनात भरले होते. आमरस हा माझा जीव की प्राण! माझ्यासाठी, खाण्यात आमरसाचे जे स्थान तेच दारुमध्ये टकीलाचे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा संगम असलेले कॉकटेल तितकेच कातिल असणार ह्याची खात्री होती.

ह्या मंगळवारी लग्नाचा वाढदिवस होता, तो आणि ग्रीष्म लाउंजोत्सव यांचे औचित्य साधून त्या मॅन्गो मार्गारीटाचा बार उडवायचे ठरवले. सगळे साहित्य घरात होतेच. त्यामुळे खरंच मॅन्गो मार्गारीटाचा बार ‘उडाला’!

साहित्य:

टकीला १ औस (३० मिली)
क्वाँत्रो (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक) १ औस (३० मिली)
अर्ध्या आंब्याचा गर
अर्ध्या मोसंबीचा रस
बर्फ
आंब्याची चकती सजावटीसाठी
ग्लास कॉकटेल ग्लास किंवा मार्गारीटा ग्लास

कृती:

ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य घालून घ्या. त्यानंतर ब्लेंडरमध्ये अर्धा ब्लेंडर भरेल एवढा बर्फ भरून घ्या.

सर्व मिश्रण एकजीव होइपर्यंत मध्यम गतीने ब्लेंड करा.

आता ते मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या आणि आंब्याची चकती ग्लासच्या रीमला खोचून घ्या.

झक्कास आणि बहारदार मॅन्गो मार्गारीटा तयार आहे :)

यावर आपले मत नोंदवा

मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge)

‘मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज)’ मालिकेतील आजचे मॉकटेल आहे ‘बे रूज’

पार्श्वभूमी:

बे रूज हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या अर्थ Red Bay. मोनिन ह्या प्रख्यात फळांचे सिरप बनवणार्‍या फ्रेंच कंपनीचे सिरप रिलायंस मॉल मधे शोधाशोध करताना मिळाले. हे मॉकटेल ‘ब्लॅक करंट’ ह्या फळाच्या सिरप पासून बनले आहे. त्या बाटलीवर एक कॉकटेल आणि एक मॉकटेल अशी रेसिपी असते. ही रेसीपी त्या सिरपच्या बाटलीवरच मिळाली :)

फारच सोपी रेसिपी आहे ही, साहित्यही एकदम लिमीटेड.

साहित्य:

मोनिन ब्लॅक करंट सिरप १0 मिली
क्रॅनबेरी ज्युस २ औस (६0 मिली)
सोडा
बर्फ
स्ट्रॉ
लिंबाची चकती सजावटीसाठी
ग्लास मॉकटेल ग्लास

कृती:

सर्व साहित्य (सोडा सोडून) शेकर मध्ये बर्फ टाकून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला घाम फुटला की मॉकटेल झाले असे समजावे.

आता ग्लासच्या रीमला लिंबाचा काप लावून मॉकटेल सजवा.

लालसर रंगाचे ‘बे रूज’ तयार आहे :)

यावर आपले मत नोंदवा

कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅंन्गो टॅन्गो

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गो

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, ‘ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव‘ असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो.

खर्‍याखुर्‍या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल. हे माझे इंप्रोवायझेशन, ‘लेडिज स्पेशल’ कॅटेगरीमध्ये बसवायचे होते, त्यामुळे फक्त वोडका एवढाच बेस वापरून हा प्रयत्न केला आहे. त्यात पुढ्च्या कॉकटेल्समध्ये आणखिन प्रयोग करून ‘मिक्सॉलॉजी’च्या वेगवेगळ्या खुब्या वापरून चव आणि लज्जत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.

प्रकार वोडका बेस्ड कॉकटेल, लेडिज स्पेशल
साहित्य
वोडका 1 औस (30 मिली)
आंब्याचा ज्यूस 2 औस (60 मिली)
आंब्याचे आइसक्रीम 2 स्कूप
बर्फ
ब्लेंडर
ग्लास वाइन ग्लास

कृती:

खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरमध्ये आइसक्रीम, आंब्याचा रस आणि वोडका ओतून घ्या.

ब्लेंडरमध्ये साधारण मध्यम वेगाने हे सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.

आता हळूवारपणे ते मिश्रण ग्लासात ओतून घ्या.

आंब्याच्या अफलातून चवीचे स्मूथ अ‍ॅन्ड सिल्की कॉकटेल तयार आहे :)

2 प्रतिक्रिया

राजेश सातमकर

शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” असे बोलून माझ्या मनातली नेमकी कळकळ एकेकाळी शब्दात व्यक्त करणारा आणि त्या वाक्याने एकदम जीवलग बनलेला एक साधा सरळ मुलगा, राजेश सातमकर.

१९९० साली दहावी नंतर आमच्या शाळेच्या परंपरेप्रमाणे (आमची शाळा तंत्र-निकेतन होती, आठवी ते दहावी टेक्निकल) डिप्लोमासाठी भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला ऍडमिशन घेतली. त्यावेळी वर्गात शिकवलेले सगळेच्या सगळे इंग्रजीत असल्याने काही म्हणजे काही कळायचे नाही. त्यात पहिल्या आठवड्यात ज्याच्या बाजूला बसलो होतो तो समदु:खी असावा ह्या अपेक्षेने त्याला विचारले, “तुला कळते का रे?” तर तो एकदम फुशारकीने म्हणाला, “हं, त्यात काय? कळते आहे सगळे.” त्याच्याशी पुढे बोलणे झाल्यावर कळले की त्याची ‘मेरिट’ ३ मार्कांनी हुकली होती. च्यायला, माझी तर बोलतीच बंद झाली. मग, मराठी माध्यमातून शिकलो असल्याने आणि त्या वातावरणात बिचकून जायला होत असल्याने, समदु:खी मित्रांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यात पहिला मित्र भेटला धनुराम. वेव्हलेंग्थ जुळली. त्याची तोपर्यंत बर्‍याच जणांशी मैत्री झालेली होती.

भौतिकशास्त्राला एक प्रोफेसर नायर होते शिकवायला. मिलिटरी रिटायर्ड माणूस, सणसणीत आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा. प्रयोगशाळेत कसलेतरी संशोधन करत असलेला उपद्व्यापी माणूस. पहिल्या महिन्यातच माझी जर्नल तपासताना त्यांनी माझी भर प्रयोगशाळेत सर्वांसमोर लाज काढली, कारण काय? तर मी Specimen ह्याचे स्पेलिंग मी Speciman असे केले होते. मला त्यावेळी मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. सर्व इंग्लिश मिडीयमकर ‘कुठून येतात कोण जाणे’ असल्या नजरेनी बघत होते माझ्याकडे त्यावेळी, त्यामुळे भयंकर अपमानित व्ह्यायला झाले होते.

रिसेसमध्ये, कॅन्टिनमध्ये, धनुरामबरोबर बसून जवळजवळ रडतच बोलत बसलो होतो. तोच खांद्यावर हात आणि कानावर, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” हे शब्द एकाचवेळी पडले. कोण बाबा हे म्हणून मागे बघितले तर एक काळा सावळा, शिडशिडीत, किंचित कुरळे असलेल्या, बारीक कापलेल्या केसांचा तेल लावून चपटा भांग पाडलेला, मिसरूड फुटलेला, दाढीची लव तुरळक वाढलेला, चेहेर्‍यावर तारुण्यसुलभ तारुण्यपीटिका, उंचीने माझ्यापेक्षा एखादं इंच कमी असलेला मुलगा, स्वच्छ आणि निखळ हसत माझ्याकडे बघत होता. त्यावेळी हसताना त्याचे चमकणारे शुभ्र दात आजही मला लख्ख आठवतात. “राजेश, राजेश सातमकर”, असे म्हणत त्याने मला ‘शेक-हॅन्ड’ केला. त्या हाताच्या उबदार आणि घट्ट पकडीबरोबरच मैत्रीचे नातेही त्या पकडीसारखेच घट्ट होणार ह्याची खात्री त्याच्या निर्मळ आणि निखळ हास्याने त्यावेळी झाली.

तोही माझ्यासारखाच इंग्रजीला काहीसा वैतागला होता. त्यानंतर जेव्हा केव्हा आम्ही इंग्रजीला वैतागून जायचो, कोणी नवीन प्रोफेसर किंवा मॅडम येऊन इंग्रजी झाडून गेल्या आणि काही कळले नाही की कॅन्टिनमध्ये चहा पीत पीत राजेश त्याचे नेहमीचे पेटंटेड वाक्य ऐकवायचा, “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” पण तो माझ्याइतका वैतागलेला नसायचा. त्याचे कारण मी त्याला एकदा न राहवून विचारले तेव्हा कळले की त्याची थोरली बहीण कुठल्याश्या नामांकित कॉलेजात शिकणारी आणि स्कॉलर होती. ती त्याचा अभ्यास घ्यायची. “च्यायला, नशीबवान आहेस रे तू”, असे मी त्याला म्हणायचो तेव्हा तो मुग्ध हसायचा.

त्यानंतर आमचे मैत्रीचे बंध जुळत गेले आणि राजेश सातमकर कळत गेला. पहिल्या आठवड्यात माझा बाजूला बसलेला सो कॉल्ड ‘स्कॉलर’ ज्याची मेरिट ३ मार्कांनी हुकली होती तो आणि राजेश गिरगावातल्या एकाच शाळेतले विद्यार्थी आणि वर्गबंधू आहेत हे समजल्यावर मी चाटच पडलो. कारण तो स्कॉलर राजेशशी जास्त बोलायचा नाही आणि मैत्रीचा ओलावा तर कधीच जाणवायचा नाही. मला त्याचे खूप आश्चर्य वाटायचे. पण पुढे कळले की राजेशचे वडील त्यांच्या शाळेत शिपाई होते. राजेश त्यांच्या शाळेतला एक स्कॉलर होता. त्याचे जरा जास्त कौतुक व्हायचे शाळेत कारण कठिण परिस्थितीत राहूनही त्याची शैक्षणिक प्रगती देदीप्यमान होती आणि ते कौतुक त्या स्कॉलरला आवडायचे नाही.

हुषार असलेला राजेश स्वभावाने अगदी सरळ आणि सज्जन कॅटेगरीतला होता, नाकासमोर चालणारा. त्याच्या तोंडून कधीही अपशब्द यायचे नाहीत. खूप चिडला, हे ही क्वचितच व्हायचे, की मात्र “नालायक” एकढाच एक जहाल शब्द त्याच्या तोंडून पडायचा पण लगेच त्याच्या निखळ हास्याने त्या शब्दाची जहालता शीतल होऊन जायची. माझ्या तोंडाचे तर तेव्हा गटारच असायचे. भकारात्मक शब्दांनीच वाक्यं सुरू व्हायची आणि संपायचीही. त्यावेळी तो मला उपदेश न करता नुसते डोळे मोठे करून निषेध नोंदवायचा. त्याच्याबरोबर मी ‘इक्विलिब्रियम’वर एक फिजिक्सचा प्रोजेक्ट केला होता. त्यात एक बाहुली असते जिला असेही वाकवले आणि पाडले तरीही ती पुन्हा मूळ स्थितीत येते असा तो प्रोजेक्ट होता. चेष्टेने मी त्या बाहुलीला ‘जड बुडाची’ म्हणायचो. त्यावेळी मात्र माझ्या त्या शब्दावर तो मनमुराद हसला होता, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत.

त्या नंतर मला आमच्या पॉलीटेक्निकच्या शेजारी असलेल्या मिठीबाई कॉलेजचा शोध लागला. त्या कॉलेजात बर्‍याच बॉलीवूडच्या नट्या शिकून गेल्या आहेत ही बातमी कळल्यावर लेक्चर बंक करून दुपारी मिठीबाई कॉलेजच्या कॅन्टिनमध्ये सौंदर्यस्थळे न्याहळीत बसणे आणि घरी जाताना भागुबाईवरून अंधेरी स्टेशनला न जाता मिठीबाई कॉलेजवरून चालत चालत विले पार्ले स्टेशनला जाणे हा भागुबाईमधील जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन बसला होता. मी लेक्चर बंक करून मिठीबाईला जातो ह्याचा त्याला विलक्षण अचंबा वाटायचा. त्याचा निषेध तो, “अरे, तू एका शिक्षकाचा मुलगा आहेस ना, तुला हे शोभत नाही” असे बोलून व्यक्त करायचा. मला त्यावेळी खरंतर त्याचा खूप राग यायचा पण त्याच्या हसण्याने तो मावळूनही जायचा. मिठीबाई कॉलेजवरून स्टेशनला जाताना हा पठठ्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूनं जायचा. मग मी त्याला खूप पिळायचो. “अरे, भोxxx, ही हिरवळ बघ ना बाजूची. सौंदर्याचा नजरेने तरी आनंद घे” असे म्हणायचो. खूप वैतागलो की मग मी माझा एक ठेवणीतला डायलॉग त्याच्यावर फेकायचो, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा? म्हणून म्हणतो, बघ जरा आजूबाजूला फुललेले हे ताटवे!” त्यावर तो फक्त मंद हसायचा आणि त्याचा हुकुमाचा एक्का बाहेर काढायचा, “हे तुझे थोर आणि साहित्यिक विचार जर तुझ्या वडिलांनी ऐकले तर त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा विचार कधी केला आहेस का?” आता ह्यावर काय बोलणार? “मर भोxxx”, असे बोलून मी त्याला टपल्या मारायचो.

पहिल्या सेमिस्टरला सगळे जण चक्क पास झालो. त्यामुळे त्याच्या “शिक्षण मातृभाषेतूनच असायला हवे!” ह्या पालुपदाची धार कमी झाली असली तरी सज्जनपणाच्या आचरणाची धार अणुकूचीदार होत होती. त्याचे मिठीबाई कॉलेजवरून जातानाचे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चालत जाणे अजूनही कायम होते. फक्त एक फरक पडला होता. तो बर्‍याच वेळा गैरहजर असायचा दुसर्‍या सेमिस्टर मध्ये, आजारी असायचा. त्यामुळे आणि दुसर्‍या सेमिस्टरला जरा मॅच्युरिटीही आल्यामुळे माझे मित्रांचे विश्वही जरा बदलले होते. कूपर हॉस्पिटलाकडच्या बाजूच्या एका टग्या मुलांचा अड्डा असलेल्या बस स्टॉपचा शोध लागला होता. तिथे वावर वाढला असल्याने राजेशचे गैरहजर असणे तसे जाणवायचे नाही. तसेही तो मला नेहमी मी त्या बस स्टॉपवर जाऊ नये म्हणून वेळोवेळी झापायचाही. पण मैत्रीचे वीण तशीच घट्ट होती.

दुसर्‍या सेमिस्टरच्या शेवटी किंवा तिसर्‍या सेमिस्टरच्या सुरुवातीला तो खूप दिवस आलाच नाही. चक्क चाचणी परीक्षेलाही आला नाही. हे मात्र अचंबित करणारे वर्तन होते. मग त्याच्या वर्गमित्र, सो कॉल्ड स्कॉलर, याला आम्ही त्याच्या घरी जाऊन चौकशी करून यायला सांगितले. आम्ही त्याची केलेली मनधरणी त्याने तशीही धुडकावून लावली होती कारण तो अंधेरीला राहायला आला होता. पण कोणत्यातरी प्रोफेसरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन यायला सांगितल्यामुळे त्याला जावे लागले. एका वीकएंडला तो गिरगावात जाऊन आला. सोमवारी आल्यावर,“राजेश खपला” असे तो आम्हाला म्हणाला. दोन मिनिटे मला तो नेमके काय म्हणतोय ते कळलेच नाही. मग नंतर कळले की राजेश सातमकर ह्या जगात नव्हता. माझी तर हे ऐकून दातखीळच बसली. सर्व जाणिवा एकदम बधीर होऊन सुन्न व्हायला झाले. त्याचा हसरा चेहेरा नजरेसमोर फेर धरून नाचू लागला आणि त्याला मजे मजेत म्हटलेले, “भxx, समजा उद्या जर गचकलास, तर काय उपयोग तुझ्या आयुष्याचा?” हे राहून राहून आठवायला लागले.

राजेशला बोन कॅन्सर होता. एखाद्या साध्या सरळ माणसाबरोबर नियती कसा खेळ खेळेल हे सांगणे कठीण असते. मात्र  राजेशशी नियतीने खेळलेला हा खेळ मनाला चटका लावून गेला. त्याला एकदा, “काय रे, काय आजारी असतोस सारखा? कुठल्या डॉक्टरला दाखवलेस?” असे विचारले असताना त्याने टाटा हॉस्पिटलाचा केलेला उल्लेख आठवून त्याची लिंक त्यावेळी लागली. अतिशय जवळचा बनलेल्या आणि कायम हसत राहणार्‍या राजेशचे असे अचानक सोडून जाणे मनाला चटका लावून गेले होते. काही कारणामुळे त्याच्या घरी कधी जाता आले नाही. 1-2 मित्र त्याच्या घरी त्याच्या तेराव्याला जाऊन आले. मला का कोण जाणे, जायची प्रचंड इच्छा असूनही जावेसे वाटले नाही आणि गेलोही नाही. त्या गोष्टीची बोच अजूनही मनात कायम आहे.

आजही जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या की ती राजेश सातमकर आवर्जून आठवतो आणि मनात एक आवाज उमटतो, “राजेश, गेलास भोxxx, पण एकदा जरा मिठीबाईच्या रस्त्यावरून अलीकडून चालला असतास तर ‘समजा उद्या जर गचकलास’ ह्या माझ्या वाक्याची बोच मला आयुष्यभर बाळगावी लागली नसती”.

2 प्रतिक्रिया

कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन

पार्श्वभूमी:

गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व  साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. :)

प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल

साहित्य:

वोडका 1.5 औस (45 मिली)
पॅशन फ्रूट लिक्युअर 1 औस (30 मिली)
क्रॅनबेरी ज्युस 4 औस (120 मिली)
पायनॅपल ज्युस 2 औस (60 मिली)
बर्फ
लिंबचा 1 काप सजावटीसाठी
1 स्ट्रॉ
ग्लास हाय बॉल

Cocktail

कृती:

ग्लासमधे बर्फ भरून घ्या.

बर्फाच्या खड्यांवर वोडका ओतून घ्या

आता लिक्युअर आणि क्रॅनबेरी ज्युस वोडकावर ओतून घ्या

मस्त लाल रंग आला आहे ना! :)   आता त्यात पायनॅपल ज्युस घाला. कॉकटेला वरच्या भागात मस्त पिवळसर रंग येइल.
लिंबाचा काप घालून सजवा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह  करा किंवा पिऊन टाका.

वर पिवळसर आणि खाली लाल अशा मस्त रंगाचे बे ऑफ पॅशन तयार आहे. :)

१ प्रतिक्रिया

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, “च्यामारी, काय आचरटपणा आहे हा”, असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते. त्यामुळे त्या लिखाणाला मान्यता मिळाली आणि बरेच जण पुढे होऊन धीटपणे त्या प्रकारचे लेखन करू लागले.

इथं पर्यंत ठीक होते. एक वाचक म्हणून वाचकाला प्रस्थापित साहित्याबरोबरच एक आगळा साहित्यप्रकार अनुभवायला मिळून त्याचे अनुभवविश्व समृद्ध होण्याचा एक मार्ग खुला झाला होता. पण पुढे त्याला लागू नये ते वळण लागले. ते मुख्यत्वे राजकीय छापाचे आहे. त्या नंतर तो गट प्रबळ होत गेला. खरेतर हे साहित्य समृद्धतेचे आणि प्रगतीचे लक्षण असायला हवे होते. पण वाचकांच्या दुर्दैवाने तसे न होता ‘एकाने गाय मारली तर दुसर्‍याने लगेच वासरू मारावे’अशा मार्गाने तो गट एका चळवळीचे रुपडे घेऊन पुढे आला. पुढे ते त्यांना विद्रोही असे म्हणवून घेऊ लागले.

पण मुळात विद्रोही म्हणजे काय? आणि विद्रोही साहित्य म्हणजे काय? ह्यावर त्या गटातच एकवाक्यता नाही असे मला वाटत होते कारण मलाही हे विद्रोही साहित्य म्हणजे शोषित समाजातील लेखकांनी लिहिलेले साहित्य असेच वाटायचे. म्हणजे त्याची व्याप्ती तेवढीच मर्यादित होते होती. त्यामुळे ह्या वर्षी एक सोडून दोन विद्रोही साहित्य संमेलन होणार म्हटल्यावर हसूच आले होते. अरे, प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून परिवर्तन आणायचे आहे ना? मग निदान चूल तरी एक मांडा अशा मताचा मी होतो. त्यामुळे एक आचरटपणा ह्यापलीकडे त्याकडे लक्ष द्यावे असे मला कधीही वाटले नाही. कारण चिपळूणच्या संमेलनाच्या ‘परशू’ वरून झालेला गोंधळ आणि नंतर विद्रोही साहित्य संमेलनातील मान्यवरांनी तोडलेले तारे ह्यामुळे हा सगळा फार्स आहे असेच मला वाटते.

खरेतर कोणतेही साहित्य संमेलन का? हाच मूलभूत प्रश्न मला छळतो. ह्या संमेलनामुळे रसिकांचे आणि वाचकांचे काय भले होते हेच मला कळलेले नाही. पण त्यामुळे हे प्रस्थापित आणि विद्रोही ह्यांच्या मत-मतांतराच्या भुलभुलैयात न फसण्याचे मी माझ्यापुरते ठरवले होते.

पण आज एका मित्राने खालील चित्रफीत पाठवली आणि वैचारिक गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली. भालचंद्र नेमाड्यांना मिळालेल्या जन्मस्थान पुरस्काराच्या सोहळ्यात त्यांनी केलेले हे भाषण आहे. त्यात त्यांनी व्यवस्था म्हणजे काय आणि त्यात कसे परिवर्तन अपेक्षित आहे हे अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे.

ह्या भाषणात त्यांनी भारतातील सर्व वर्गातील स्त्रियांनी राम मंदिराला विरोध करायला हवा असे म्हटले आहे. ते तसे का? तेही त्यांनी त्या भाषणात मांडले आहे. ते ऐकल्यावर मला एकदम डॅन ब्राउनची दा-विंची-कोड ही कादंबरी आठवली. त्यात त्याने मांडलेली थियरी आठवली. त्याने मांडलेली ती थियरी प्रस्थापित चर्चच्या मतांशी द्रोह जरी असला तरीही तो त्याच्या मतांनी विद्रोही ठरतो कारण तो प्रस्थापित चर्चव्यवस्थेच्या वेगळे होऊन काही मांडू इच्छितो.

ह्या भाषणाने, विद्रोही आणि विद्रोही साहित्य म्हणजे नेमके काय असायला हवे, ह्याबद्दल माझ्या मनात एक नक्कीच वेगळी विचारधारा सुरू व्हायला मदत झाली आहे.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 757 other followers