चावडीवरील गप्पा – सचित्र झलक


नमस्कार मंडळी! चावडीवरच्या गप्पांची मैफल आवडते ना? चावडीवरील सर्व वल्ली आहेतच एकदम नग, एकापेक्षा एक. आजपर्यंत त्यांच्या गप्पा जशा तुम्ही ऐकल्यात तशा त्या, माझी मिसळपाव.कॉम वरील मैत्रिण पूजा पवार हिनेही ऐकल्या आणि ती सोकाजीनानांची फॅन झाली. त्यांच्या चहाची चाहत तिला एकदम भावली. तिने मिसळपाव च्या दिवाळी अंकात ह्या सर्व मंडळींची एक फर्मास चर्चा ‘हौन जाउ दे’ असा आदेश दिला. (हो, ती आदेशच देते!) त्याला मिसळपाव वरील अजुन एक कलाकार मित्र, अभिजीत देशपांडे ह्याने दुजोरा देत ही फर्मास चर्चा सचित्र करुयात असा प्रस्ताव मांडला आणि ह्या वल्लींना दृश्य रुप द्यायचा विडा उचलला.

त्या दोघांच्या प्रयत्नांमुळे ह्या दिवाळीला चावडीवरील सर्वांना चित्रमय अस्तित्व मिळून तुमच्या पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पूजा पवार आणि अभिजित देशपांडे या दोघांचे शतशः आभार.

चला तर मग आता तुम्हाला मी सर्वांची ओळख करून देतो.

घारूअण्णा
हे आमचे घारूअण्णा, ह्यांचे बालपण गेले रत्नागिरीच्या मधल्या आळीत, तरुणपण गेले चिपळूणमध्ये आणि आता सध्या उतारवयात पुण्यात स्थायिक झाले आहेत.

रत्नागिरीच्या मधल्या आळीत ह्यांची सगळी हयात न गेल्यामुळे आणि पुण्यातही सदाशिव पेठेत न राहिल्यामुळे, त्यांचे बोलणे जरी तिरकस असले तरीही त्या तिरकस बोलण्याला धार नसते.

ह्यापलीकडे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असल्याने चावडीवर हजेरी लावून उरलेल्या वेळेत वहिनींना मंडईत घेऊन जाणे, संध्यानंद वाचणे, देवळात जाणे यात त्यांचा सारा वेळ जातो. या घारूअण्णांचा देवावर भयंकर विश्वास! अत्यंत धार्मिक आणि सनातनी.

बरेचसे अंधश्रद्धाळूही, भुजबळकाका आणि यांचे खटके उडण्याचे हे ही एक कारण.

भुजबळकाका
हे आमचे भुजबळकाका, यांना त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे चावडीवर बहुजनहृदयसम्राट हे नाव मीच दिले आहे. तसेही यांची पुण्या-मुंबईकडच्या अभिजनांच्या मताशी नेहमीच असहमती असते, पण त्यांचे विचार सर्वसमावेशक असतात.

भुजबळकाका सध्या लष्करातून निवृत्त होऊन आता एका खाजगी कंपनीत चीफ सुरक्षा अधिकारी (CSO) म्हणून काम करत आहेत.

सारी हयात लष्करात गेल्याने शिस्तीचे प्रचंड भोक्ते. कुठलाही उथळपणा यांना चालत नाही अगदी विचारांमधलाही. बालपण अती दुर्गम भागातल्या खेड्यात गेल्यामुळे, परिस्थितीचे बरेच टक्के टोणपे खाल्ल्यामुळे आणि चटके सोसल्यामुळे, विचारांमध्ये एका प्रकारची सर्वसमावेशकता आणि ठामपणा असतो यांच्या.

शामराव बारामतीकर
हे आमचे शामराव बारामतीकर, मूळचे बारामतीचे पण नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य. दर महिन्याला बारामतीला जाऊन शेतीचे कमीजास्त बघणे आणि गावाकडच्या नातेवाइकांची ख्यालीखुशाली विचारणे हा नेम कधी चुकत नाही.

आता बारामतीचेच असल्याने त्यांची ‘साहेबांच्या’ प्रती असलेली निष्ठा पदोपदी जाणवते. वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्या कुटुंबावर ‘साहेबांचे’ बरेच उपकार आहेत असे त्यांनी मला खाजगीत बर्‍याचदा सांगितले आहे.

त्यामुळे राजकारणात साहेबांची बाजू लावून धरणे हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त असते. पण त्यांचा ‘टग्या’दादांवर अतिशय राग आहे, त्या ‘टग्या’दादांमुळे  ‘साहेबांची’ प्रतिष्ठा कमी होते असे त्यांचे मत आहे. पण सुप्रियाताईंबद्दल त्यांना का कोण जाणे त्यांना खूप जिव्हाळा आहे. 

नारुतात्या
हे आमचे नारुतात्या, कोणाच्याही न अध्यात न मध्यात. यांना सर्वांचेच म्हणणे पटते. थोडक्यात काय तर यांचा नेहमी ‘बेंबट्या’ होत असतो.

साधे सरळ व्यक्तिमत्त्व. यांची सोकाजीनानांवर अपार श्रद्धा. सोकाजीनाना जे म्हणतील ते करण्यास नेहमी तत्पर.

सरकारी नोकरीची शिल्लक राहिलेली काही वर्षे, प्रमोशनचे स्वप्न बघत घालवत आहेत कशीबशी. पण स्वभावाने अगदीच भिडस्त असल्याने साहेबांचे आणि त्यांचे मतभेद होत नाहीत. 

चिंतोपंत
हे आमचे चिंतोपंत, संघाच्या, ब्राह्मणी हिंदुत्वाच्या, मुशीत सारे बालपण आणि तारुण्य नागपुरात पोसले गेलेले आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात येऊन स्थायिक झालेले.

ह्यांचे बरेचसे नातेवाईक आणि मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. पण ह्यांना परदेशात राहणे आवडत नसल्याने सध्या निवृत्त होऊन एका पेन्शनराचे आयुष्य मायदेशातच व्यतीत करत आहेत. 

ह्यांचे मूळ कोंकणातले असल्याने यांचे आणि घारूअण्णांचे सूत व्यवस्थित जमते.

सोकाजीनाना
तर मंडळी, हे सोकाजीनाना, कमावत्या वयात, कमावलेला पैसा व्यवस्थित डोके लावून गुंतवला असल्याने आता व्ही. आर. एस. घेऊन स्वच्छंद आयुष्य जगत आहेत. कामानिमित्ताने संपूर्ण जग पालथे घातले असल्याने जाणीवा प्रगल्भ होऊन अनुभवाचे विश्व व्यापक झालेले चावडीवरचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. ह्यांचा शब्द अंतिम आणि प्रमाण मानला जातो चावडीवर.

अनुभवसिद्ध असल्याने कुठल्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे यांची. एखाद्या विषयाबद्दल माहिती नसेल तर त्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्याचा ह्यांचा ध्यास विलक्षण आहे. त्यामुळे माहिती नसली तर गप्पा राहून चिंतन करणे आणि अभ्यास करून माहिती मिळाल्यावर, आपल्या विचाराची बैठक भक्कम करूनच मग हे त्यांची मते चावडीवर मांडतात. त्यामुळे त्यांना चावडीवर फार मान आहे.

“मंडळी आता ओळख तर झाली आहेच, तीही चक्क सचित्र. मग आता येत रहा चावडीवर नेहमी आठवणीने. काय आहे गप्पा मारायला आम्हाला आवडतेच पण आपल्या गप्पा कोणीतरी ऐकते, ऐकून त्यावर चर्चा होते हे खूपच सुखावह असते हो! चला आता मी आपली रजा घेतो. काय आहे, चहाची वेळ झाली आमच्या आणि आज ऑर्डर द्यायला कोणीही नाही त्यामुळे चहा प्यायला घरीच जावे लागेल. एक छानसा गजरा घेतो सौ.साठी, तेवढाच जरा मसाला चहा मिळेल हो, काय?”,” सोकाजीनाना मंद हसत.

चावडी
अस्मादिक
सर्वात शेवटी अस्मादिक 🙂

8 thoughts on “चावडीवरील गप्पा – सचित्र झलक

  1. आभासी जगतात चावडी वरील गप्पा एक ब्र्यांड होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे, नजीकच्या काळात वास्तविक जीवनातून अनेक मान्यवर सुद्धा वाहत्या वाऱ्याची दिशा नेमकी कोणती आहे हे पाहण्यासाठी चावडीवर दाखल होतील.

    Like

यावर आपले मत नोंदवा