व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, “च्यामारी, काय आचरटपणा आहे हा”, असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते. त्यामुळे त्या लिखाणाला मान्यता मिळाली आणि बरेच जण पुढे होऊन धीटपणे त्या प्रकारचे लेखन करू लागले.

इथं पर्यंत ठीक होते. एक वाचक म्हणून वाचकाला प्रस्थापित साहित्याबरोबरच एक आगळा साहित्यप्रकार अनुभवायला मिळून त्याचे अनुभवविश्व समृद्ध होण्याचा एक मार्ग खुला झाला होता. पण पुढे त्याला लागू नये ते वळण लागले. ते मुख्यत्वे राजकीय छापाचे आहे. त्या नंतर तो गट प्रबळ होत गेला. खरेतर हे साहित्य समृद्धतेचे आणि प्रगतीचे लक्षण असायला हवे होते. पण वाचकांच्या दुर्दैवाने तसे न होता ‘एकाने गाय मारली तर दुसर्‍याने लगेच वासरू मारावे’अशा मार्गाने तो गट एका चळवळीचे रुपडे घेऊन पुढे आला. पुढे ते त्यांना विद्रोही असे म्हणवून घेऊ लागले.

पण मुळात विद्रोही म्हणजे काय? आणि विद्रोही साहित्य म्हणजे काय? ह्यावर त्या गटातच एकवाक्यता नाही असे मला वाटत होते कारण मलाही हे विद्रोही साहित्य म्हणजे शोषित समाजातील लेखकांनी लिहिलेले साहित्य असेच वाटायचे. म्हणजे त्याची व्याप्ती तेवढीच मर्यादित होते होती. त्यामुळे ह्या वर्षी एक सोडून दोन विद्रोही साहित्य संमेलन होणार म्हटल्यावर हसूच आले होते. अरे, प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून परिवर्तन आणायचे आहे ना? मग निदान चूल तरी एक मांडा अशा मताचा मी होतो. त्यामुळे एक आचरटपणा ह्यापलीकडे त्याकडे लक्ष द्यावे असे मला कधीही वाटले नाही. कारण चिपळूणच्या संमेलनाच्या ‘परशू’ वरून झालेला गोंधळ आणि नंतर विद्रोही साहित्य संमेलनातील मान्यवरांनी तोडलेले तारे ह्यामुळे हा सगळा फार्स आहे असेच मला वाटते.

खरेतर कोणतेही साहित्य संमेलन का? हाच मूलभूत प्रश्न मला छळतो. ह्या संमेलनामुळे रसिकांचे आणि वाचकांचे काय भले होते हेच मला कळलेले नाही. पण त्यामुळे हे प्रस्थापित आणि विद्रोही ह्यांच्या मत-मतांतराच्या भुलभुलैयात न फसण्याचे मी माझ्यापुरते ठरवले होते.

पण आज एका मित्राने खालील चित्रफीत पाठवली आणि वैचारिक गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली. भालचंद्र नेमाड्यांना मिळालेल्या जन्मस्थान पुरस्काराच्या सोहळ्यात त्यांनी केलेले हे भाषण आहे. त्यात त्यांनी व्यवस्था म्हणजे काय आणि त्यात कसे परिवर्तन अपेक्षित आहे हे अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे.

ह्या भाषणात त्यांनी भारतातील सर्व वर्गातील स्त्रियांनी राम मंदिराला विरोध करायला हवा असे म्हटले आहे. ते तसे का? तेही त्यांनी त्या भाषणात मांडले आहे. ते ऐकल्यावर मला एकदम डॅन ब्राउनची दा-विंची-कोड ही कादंबरी आठवली. त्यात त्याने मांडलेली थियरी आठवली. त्याने मांडलेली ती थियरी प्रस्थापित चर्चच्या मतांशी द्रोह जरी असला तरीही तो त्याच्या मतांनी विद्रोही ठरतो कारण तो प्रस्थापित चर्चव्यवस्थेच्या वेगळे होऊन काही मांडू इच्छितो.

ह्या भाषणाने, विद्रोही आणि विद्रोही साहित्य म्हणजे नेमके काय असायला हवे, ह्याबद्दल माझ्या मनात एक नक्कीच वेगळी विचारधारा सुरू व्हायला मदत झाली आहे.