हा लेख मिसळपाव.कॉम ह्या संस्थळाच्या श्रीगणेश लेखमाला २०१९ मधील ह्या लेखात पूर्वप्रकाशित!
“सोशल मिडीयवर एक व्हिडीयो व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो लाखो नोकर्यांवर गदा येणार अस म्हटलय!” चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.
“नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, ते ही एकदम सोशल मीडिया-बिडीया. हम्म, जोरात आहे गाडी!”, नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.
“नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो! “, घारुअण्णा तिरमिरीत.
“अहो चिंतोपंत, कसला व्हिडियो आणि काय आहे काय त्या व्हिडियोत एवढं व्हायरल होण्यासारखं?”, बारामतीकर.
“व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?”, नारुतात्या वेड पांघरत.
“नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे.”, चिंतोपंत.
“म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?”, बारामतीकर मोठा आ करत.
“बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी काम रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.
“म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते! “, नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत.
“तितकं सोपं नाहीयेय ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत, खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही.”, चिंतोपंत.
“विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचे. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.
“घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं.”, इति भुजबळकाका.
“अहो बहुजनह्रदयसम्राट, असं कसं, चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडियोत काही तथ्य असेलच ना.”, घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत.
“होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गुगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हे सुद्धा सांगतंय, आता बोला!”, चिंतोपंत.
“हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?”, घारुअण्णा चिंताग्रस्त होत.
“काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!”, इति बारामतीकर.
“अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसेच टेस्ट करण्यासाठी केला जातोय.”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका.
“काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!”, घारुअण्णा बावचळून जात.
“अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्या पादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाईक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वातक्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसऍप्स म्हणजे फोटो प्रोसेस करणारी ऍप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत.”, भुजबळकाका समजावून सांगत…
“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खुपसारा विदा (डेटा), अक्षरशः: टेराबाईट्समध्ये, पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार. “, इति भुजबळकाका.
“अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!”, नारुतात्या ‘आजी म्या ब्रह्म पाहिले’ असा चेहरा करत.
“हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!”, बारामतीकर सुस्कारा सोडत.
“अहो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.
“अहो, पण अमेरिकेततर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. ऍमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्टकरून, मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून, आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवण पण करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!”, चिंतामणी चिंताग्रस्त होत.
“साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला.”, भुजबळकाका.
“म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल तो तरून
जाईला हा अवघड काळ, काय बरोबर ना?”, बारामतीकर विचार करत.
“बारामतीकर, ते खरंच हो पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असच राहूनराहून वाटतंय!”, साशंक चिंतोपंत.
“म्हणजे त्या इंग्रजी सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रीक्ससिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका? “, घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत.
“अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!”, भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत.
“आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही अस नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?”, नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.
“आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंग हे, काळाच्या ओघात होणार्या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावले आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला अजून बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचे आणि नोकर्यांचे नेमके काय आणि होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणे उचित ठरणार नाही. त्याची कास घरून पुढे जावेच लागेल. औद्योगिक क्रांती, इलेक्ट्रॉनिक्स आणि आलिकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगिकारावंच लागेल.
पण, ह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलीजंस मुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंग मुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या ‘जाणिवेत’ न राहता, आधिभौतिक तंत्रज्ञानच्या प्रगतीने येणार्या नेणीवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेच अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलीजंस, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही ह्याची काळजी घेतली की झालं!”, सोकाजीनाना मंद हसत.
“पटतंय का? चला तर मग, आज चहा नको, बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी ते घ्या आणि तोंड गोड करा!”, सोकाजीनाना मिष्किलीने.
सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचे ताट फिरवू लागले.
गणपती लेखमाला -> श्रीगणेश लेखमाला २०१९
LikeLike